शंकर देवकुळे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, सांगली | 02 डिसेंबर 2023 : भावडांमधील भांडणाच्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या आहेत. संपत्तीच्या कारणावरून होणाऱ्या वादाच्या कहाण्या महाराष्ट्रासाठी नव्या नाहीत. पण आता आम्ही तुम्हाला दोन भावंडांची गोष्ट सांगणार आहोत. ती वाचल्यावर तुम्हीही म्हणाल अगदी राम-लक्ष्मणाची जोडी! ही गोष्ट आहे सांगलीतली… सांगलीतल्या आटपाडीमधल्या खिलारे बंधूंची… त्यांचं झालं असं की आपला भाऊ यशस्वी व्हावा. त्याने चांगलं काम करावं आणि त्यांच्या या कामानेच त्याला सर्वत्र ओळखावं, अशी अंकुश खिलारे यांची इच्छा होती आणि झालंय ही तसंच… अंकुश यांचे बंधू साहेबराव खिलारे हे गावाचे उपसरपंच झाले. त्यानंतर अंकुश खिलारे यांनी जे केलं त्याची सर्वत्र चर्चा होतेय.
आपला मोठा भाऊ साहेबराव खिलारे याने गावतल्या राजकारणात घट्ट पाय रोवून उभं राहावं. त्याच्या कामाचा दबदबा पंतक्रोशीत असावा, अशी इच्छा करगणी गावातील अंकुश खिलारे यांची मनोमन इच्छा होती. नुकतंच साहेबराव खिलारे हे करगणी गावचे उपसरपंच झाले. त्यानंतर मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून लहान भावाने गावाला आणि गावच्या राम मंदिराच्या कळसाला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील खिलारे बंधूंप्रेमाची परिसरात प्रचंड चर्चा होत आहे.
आपला भाऊ गावच्या उपसरपंच पदावर विराजमान झाला आणि आपल्या कुटूंबाचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झालं. म्हणून उपसरपंचाच्या छोट्या भावाने गावाला आणि गावातील राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालत आपला आनंद व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील भावावरचे हे बंधुप्रेम सध्या चर्चेत आहे. अंकुश खिलारे असं हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातलेल्या भावाचं नाव आहे. तर साहेबराव खिलारे असं उपसरपंच झालेल्या भावाचं नाव आहे.
अंकुश हे गलाई व्यावसायिक आहेत. त्यामुळे व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यात असतात. त्यामुळे गावातील शेती-कुटूंबाची जबाबदारी आपले ज्येष्ठ बंधू साहेबराव खिलारे यांच्यावर सोपविण्यात आलेली. मात्र भाऊ शेती सांभाळत सांभाळत आज गावचा उपसरपंच झाल्याचं सेलिब्रेशन मात्र या भावाने मोठ्या थाटामाटात केलं. यामुळे सर्वच जण अचंबित झाले होते.गावावर तब्बल 3 ते 4 तास हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालण्यात आल्या.
खिलारे कुटुंबातील कुणी ना कुणी गावचा सरपंच, उपसरपंच व्हावा, ही या कुटूंबाची खूप वर्षांपासून इच्छा होती. 20 वर्षांपूर्वी दुर्योधन खिलारे यांच्या रूपात ही संधी थोडक्यात हुकली होती. मात्र यंदा गावच्या उपसरपंच पदावर साहेबराव खिलारे यांची निवड झाली आणि खिलारे कुटूंबाचे स्वप्न पूर्ण झालं. एक स्वप्न पूर्ण झाले म्हणून साहेबराव खिलारे यांचे छोटे बंधू अंकुश खिलारे यांनी गावाला आणि गावच्या राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टर मधून प्रदक्षिणा घालण्याची इच्छा लाखो रुपये खर्च करून पूर्ण केली.