खर्च केला पण वाया नाही गेला, संरपंचांनी गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला
महाराष्ट्र शासनाकडून या विहिरीसाठी 35 लाख रुपये निधी मंजूर झाला, पण आज विहिरीला 57 लाख पेक्षा जास्त खर्च आला आहे. शासनाचे कच खाऊ 25 वर्षाचे धोरण आज बदलण्याची वेळ आली आहे.
शंकर देवकुळे, सांगली : जिल्ह्यातील मिरज (Miraj) तालुक्यातील सलगरे ग्रामपंचायतीने (Salgare Grampanchayat) धाडसी निर्णय घेतल्यामुळे सगळी चर्चा सुरु आहे. पाणीटंचाईची चाहूल लागल्याने अवघ्या दीड महिन्यात महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी 125 फूट रुंद 95 फूट खोलीची विहिर काढून गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला आहे. महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) सध्याचं धोरणं बदलून ब्रिटीश कालीन योजना अमलात आणल्या पाहिजेत असं माजी सरपंज तानाजी पाटील यांनी सांगितलं.
एकीकडे महाराष्ट्रात सत्ता संघर्ष वाद पेटला आहे, तर दुसरीकडे मिरज पूर्व भागात पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाईला ग्रामपंचायतींना तोंड देण्याची वेळ आज आली आहे. ही दुष्काळ परिस्थिती येण्यापुर्वी 7000 लोक वस्तीच्या सलगरे ग्रामपंचायतीने धाडसी निर्णय घेऊन अवघ्या दीड महिन्यात महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी सलगरे ग्रामपंचायतीने 125 फूट रुंद आणि 95 फूट खोलीची विहीर काढून गावच्या पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी प्रश्न लावला आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत मालकीची एकमेव सर्वात मोठी विहीर असल्याचा बहुमान मिरज तालुक्यातील सलगरे ग्रामपंचायतीला मिळाला आहे. सलगरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच तानाजी पाटील यांच्यामुळे हे अशक्य काम शक्य झाले आहे.
सलगरे ग्रामपंचायतीवर 25 वर्षे निर्विवाद सत्ता असताना सलगरे गावात तानाजी पाटील यांनी विकास कामाचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या पत्नी सध्या सरपंच पदी निवडून आल्या आहेत, जानेवारी महिन्याच्या सुरवातीला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकीतील पाणी गावाला कमी पडू लागले, गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आल्याने, आज 125 फूट रुंद 95 फूट खोल विहीर काढल्याने पाण्याचा मुबलक साठा लागला आहे. पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागल्याने गावातील महिलांनी आज समाधान व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र शासनाकडून या विहिरीसाठी 35 लाख रुपये निधी मंजूर झाला, पण आज विहिरीला 57 लाख पेक्षा जास्त खर्च आला आहे. शासनाचे कच खाऊ 25 वर्षाचे धोरण आज बदलण्याची वेळ आली आहे. ब्रिटिश कालीन शंभर वर्षाच्या योजना अमलात आणण्याची वेळ आली आहे. आणखी निधी जर शासनाने दिला, तर सलगरे गावचा 100 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती माजी सरपंच तानाजी पाटील यांनी दिली आहे.