बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्यात आपोआप घट? धक्कादायक प्रकार समोर आल्यानं ग्राहकांमध्ये खळबळ, नेमकं प्रकरण काय?
बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्यात आपोआप कशी काय घट झाली? यामध्ये कुणी गौडबंगाल तर नाही केले ना? बँकेतील कर्मचाऱ्यांकडून चूक तर झाली नाही ना? असे विविध सवाल उपस्थित होत आहे.
सांगली : सांगलीमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात एक धक्कादायक प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा बॅंकेच्या कवठेएकंद शाखेतील प्रकार असल्याने खळबळ उडाली असून शेतकरी वर्ग धास्तावला आहे. शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट आढळून आल्याचा प्रकार आला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कवठेएकंद शाखेतील हा प्रकार आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 200 शेतकऱ्यांनी या शाखेत सोन्याच्या पिळ्याच्या अंगठ्या गहाण ठेवल्या आहेत. त्यामुळं प्रत्येकाच्याच बाबतीत असा प्रकार घडला आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सध्या ज्या खातेदाराने बँकेकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीवरुन चौकशी केली जात आहे. केली आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी याबाबत माहिती दिली आहे.
बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्यात आपोआप कशी काय घट झाली? यामध्ये कुणी गौडबंगाल तर नाही केले ना? बँकेतील कर्मचाऱ्यांकडून चूक तर झाली नाही ना? असे विविध सवाल उपस्थित करत तर्क वितर्क लढविले जात आहे. बँकेतील या प्रकरणाच्या चौकशी कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
खरंतर जिल्हा बँक म्हंटलं की शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बँक. याच बँकेवर शेतकऱ्यांचा विश्वास असतो. जिल्ह्याची आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणूनच बँकेची ओळख आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बहुतांश व्यवहार हे जिल्हा बँकेतच असतात.
बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट आल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आता याप्रकरणी चौकशीही सुरु करण्यात आल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, यातील पहिले तक्रारदार हे कवठेएकंद मधील विश्वासराव माधवराव पाटील हे होते.
माधवराव पाटील यांनी कवठेएकंद शाखेत सोन्याची अंगठी गहाण ठेवली होती.12 एप्रिल 2023 ला त्यांनी दागिने सोडवल्यानंतर त्यात घट झाल्याचे त्यांना आढळून आले. हे प्रकरण सुरू असतानाच आणखी एक प्रकार समोर आला आहे.
कर्जदार ग्राहकानेही बँकेमध्ये गहाण ठेवलेल्या दोन पिळ्याच्या अंगठीचे वजन कमी भरल्याची तक्रार केली आहे. या घटनेमुळं शेतकरी चिंतेत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यामध्ये उडी घेतली आहे. निषेध व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. बँकेचे ग्राहक शेतकरी असल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली असून संपूर्ण शेतकऱ्यांचे या प्रकरणाच्या चौकशीकडे लक्ष लागून आहे. त्यामुळे चौकशीत काय निष्पन्न होतं हे बघणं महत्वाचे आहे.