सांगली | 01 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषणाला बसणार आहेत. 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपासून हे उपोषण सुरु होणार आहे. सावळज आणि इतर 8 गावांचा समावेश टेंभू योजनेत करावा, या मागणीसाठी हे उपोषण केलं जाणार आहे. या उपोषणासंदर्भात टीव्ही 9 मराठीशी बोलताना राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील विविध मुद्यांवर भाष्य केलं. उपोषणाबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. तसंच आगामी निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. तसंच विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं आहे.
खरंतर आज घडीला माझं वय वर्ष 24 आहे. अचानक निवडणूक लागली तर कदाचित मी निवडणुकीला उभं राहू शकत नाही. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माझ्या भविष्याची चिंता जर मी करून राजकारण करत असल्याचा आरोप हा निरर्थक आहे.निवडणुकीच्या दृष्टिकोन काम करण्याचा विचार मी माझ्या डोळ्यासमोर कधीही ठेवला नाही. वयाच्या सोळाव्या वर्षीपासून मी या मतदारसंघांमध्ये फिरतोय. या मतदारसंघातल्या प्रत्येक घटकाच्या मागे उभा राहण्याचं काम गेले अनेक वर्ष करतोय. त्यामुळे इथल्या लोकांना माहिती आहे की कोण किती अंधारात आहे. निवडणुका आल्यावर कुणी फिरायला चालू केलंय, हे पण लोकांना माहिती आहे, असं म्हणत रोहित पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.
मी असं ऐकलं की, समाज माध्यमांवरती आमची प्रसिद्धी वाढली म्हणून रोहित पाटील आणि सुमनताई हे नौटंकी करत आहेत, असा आरोप केला जातोय. खरंतर समाज माध्यमांवरती अनेक प्रकारचे लोक प्रसिद्ध होत असतात. अलीकडच्या काळात अनेक कलाकार, अनेक नृत्यांगणाही प्रसिद्ध झाल्या. पण याचा अर्थ ते प्रसिद्ध आहेत म्हणून निवडणुकीला उभं राहायचं असतं का?, असं म्हणत रोहित पाटील यांनी टोला लगावला आहे.
चांगलं काम करणाऱ्यांचा मागे लोक उभे राहतात. माझं भविष्य अंधार टाकायचं की उजेडात हे लोक ठरवतील. त्यामुळे तासगाव आणि कवठेमहंकाळ तालुक्यातल्या सत्सद विवेक बुद्धी असणाऱ्या सर्व लोकांवर माझा विश्वास आहे. ते निश्चितपणाने माझं भविष्य काय करायचं. त्यांनी जर घरी बसवलं तर घरी बसायची तयारी माझी आहे. लोक ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल, असंही रोहित पाटील म्हणालेत.