सांगलीत अफलातून निवडणूक, तरण्याबांड फळीला 80 वर्षांच्या आजी-आजोबांचे आव्हान, म्हणे पवारांसारखा करिश्मा करणार…!
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे 80 वर्षांचा योद्धा म्हणून निवडणूक लढवत होते. आणि त्यांनी करून दाखवले. मग आम्हीही विजयी होवूच असा निर्धार 80 वर्षांचे आजी आणि आजोबा व्यक्त करतायत.
सांगलीः एकीकडे देशात अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (election) रणधुमाळी सुरूय. महाराष्ट्रात (Maharashtra) येत्या काही दिवसांत महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वीच सांगली (Sangli) जिल्ह्यात एका सोसायटीची निवडणूक चांगलीच गाजतेय. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या निवडणुकीत तरण्याबांड फळीला 80 वर्षांच्या आजी-आजोबांनी दिलेले आव्हान. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. मिरज तालुक्यातील बेडग गावात सध्या सोसायटीची निवडणूक सुरूय. तब्बल 13 सदस्यांसाठी ही निवडणूक होते आहे. पण या सोसायटीमध्ये सत्ताधाऱ्यांनी कोणताही विकास केला नाही. कर्ज वाटप केली नाहीत. त्यामुळे सोसायटीचे जुने सभासद ज्यांचे वय आता 70 ते 80 च्या वर आहे. ते सध्या रिंगणात उभे राहिले आहेत.
कशी होतेय निवडणूक?
मिरजमध्ये स्वाभिमानी परिवर्तन शेतकरी पॅनल विरुद्ध सत्ताधारी मरगाई देवी शेतकरी ग्रामविकास पॅनल अशी निवडणूक होतेय. यात स्वाभिमानी परिवर्तन शेतकरी पॅनेलने वयोवृद्ध उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये एक आजी आणि तीन आजोबा रिंगणात उभे आहेत. निवडणुकीत दोन पॅनलने प्रचाराचा जोर लावलाय. येत्या 20 तारखेला येथे मतदान आहे. संध्याकाळी लगेच निकाल असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे.
ज्येष्ठ सदस्यांची चर्चा
बेडगमधील स्वाभिमानी परिवर्तन शेतकरी पॅनेलच्या वयोवृद्ध उमेदवारांची जोरदार चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. या पॅनलचे उमेदवार बाबूराव लक्ष्मण बुरसे यांचे वय आहे 90 वर्ष, तर धोंडीराम अंतू नलवडे याचे वय आहे 84 वर्ष. उमेदवार शंकर गुरुलिंग कंगुणे याचे वय आहे 74 वर्ष, तर धोंडूबाई रघुनाथ पाटील यांचे वय आहे 74 आणि दत्तात्रय रामचंद्र खरात 68 आहे. असे वयोवृद्ध उमेदवार आता तरुणांना टक्कर देणार असल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे.
शंभर वर्षे पूर्ण
मिरज तालुक्यातील बेडग गावातील 1920 साली स्थापन झालेली विकास सोसायटीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. बेडग गावची लोकसंख्या 30 हजार आहे. गावाचा परीघ 4 किलोमीटरचा आहे आणि या सोसायटीचे भागभांडवल 1 कोटी तर ठेवी 1 कोटी आहेत. या सोसायटीच्या माध्यमातून गावाचा विकास केला जातो. या विकास सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे संभाजी आबा पाटील, त्यांचे पुतणे उमेश पाटील, त्यांचे सहकारी बाळासाहेब ओमासे रिंगणात आहेत.
उत्सुकता शिगेला
तरुणांचे मरगाई देवी शेतकरी ग्रामविकास पॅनल विरोधात बेडग गावातील युवा नेते अमर पाटील आणि त्याचे 75 वर्षीय सहकारी, निवडणूक सल्लागार अॅड. के. डी. शिंदे यांचे वयोवृद्ध उमेदवाराचे स्वाभिमानी परिवर्तन शेतकरी पॅनल अशी लढत होतेय. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे 80 वर्षांचा योद्धा म्हणून निवडणूक लढवत होते. आणि त्यांनी करून दाखवले. मग आम्हीही विजयी होवूच असा निर्धार 80 वर्षांचे आजी आणि आजोबा व्यक्त करतायत. आता या सोसायटीमध्ये अशीच काहीतरी कामगिरी होते का याची उत्सुकता आहे.
इतर बातम्याः