भूषण पाटील, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी इस्लामपूर, सांगली | 01 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महायुतीत सहभागी होणार होते, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी हा दावा केला होता. त्यावर आता जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. माझं आणि संजय शिरसाट यांचं कधीही या विषयावर बोलणं झालेलं नाही. त्यांना माझ्या मनातलं कसं कळणार? त्यांचा या बोलण्याचा उद्देश मला माहित नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तसंच आगामी लोकसभा निवडणूक आणि महाविकास आघाडीतील जागावाटप यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलंय.
जयंत पाटील अजित पवार सोबत येणार होते म्हणून आमच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. हा प्रस्ताव त्यांनी पुण्यात दिला होता. जयंत पाटीलच याबाबत शरद पवारसाहेबांना सांगणार होते. जयंत पाटील शरीराने तिकडे आहेत मनाने इकडे आहेत. जयंत पाटील आता आले नाहीत. मात्र ते आमच्यासोबत येतील, असं संजय शिरसाट यांना काल म्हटलं. शिरसाट यांच्या दाव्यावर आता जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
प्रत्येक जण निवडणूक जिंकण्यासाठीच प्रयत्न करत असतो. महाराष्ट्रातील लोक आमची भूमिका मान्य करतील अशी आशा आहे. चांगलं राज्य चालवण्यासाठी जनता आम्हाला आशीर्वाद देतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचाही अस्तित्व महाराष्ट्रात मोठं आहे. ही अस्तित्वाची नाही तर विचारांची लढाई आहे. सद्यस्थितीला देशाची स्थिती चिंताजनक ज्यांना वाटते. त्यामुळे अनेकजण आमच्यासोबत यायचा विचार करतील, असंही जयंत पाटील म्हणालेत. निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पक्षांतर्गत बैठकीत दिल्लीला झाल्या आहेत. लवकरच हे जागावाटप पूर्ण होईल, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण अंतिम चरणात आलं असेल. या आदी वेळा एक दोनदा मराठा आरक्षण देऊन झालंय. मात्र आरक्षण दिल्यानंतर काही लोक कोर्टात जातात. त्यामुळे सगळ्या चाळणीतून टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत बसवून हे आरक्षण द्यावं. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच मराठा आरक्षणाचा निर्णय घेतील. गडबडीत निर्णय घेऊन चुका करू नका. रद्द न होणार आरक्षण दिलं पाहिजे त्यासाठी घाई गडबड करू नका. आरक्षणानंतर कोर्टात कोण जाईल हे गृहीत धरूनच हे आरक्षण द्यावं, असं जयंत पाटील म्हणालेत.