Maharashtra Flood | कोल्हापूर-सांगलीत पूर ओसरण्यास सुरुवात
पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील (Sangli Kolhapur Flood) पाणी हळूहळू ओसरु लागलं आहे. मात्र अनेक भागात अजूनही कमरेपर्यंत पाणी आहे.
Sangli Kolhapur Flood कोल्हापूर/सांगली : पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील (Sangli Kolhapur Flood) पाणी हळूहळू ओसरु लागलं आहे. मात्र अनेक भागात अजूनही कमरेपर्यंत पाणी आहे. आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी तुंबल्याने घरांसह शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवाने दोन दिवस पावसाने विश्रांती दिल्याने कोल्हापूर आणि कृष्णा नदीची पाणी पातळी उतरली आहे.
राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाल्याने कोल्हापूरच्या पंचगंगेची पाणीपातळ 45 फुटापर्यंत येत आहे. तर सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी 57.8 फुटांवरुन आता 49 फुटांपर्यंत आली आहे. पंचगंगेची धोका पातळी 43 तर कृष्णेची 45 फूट इतकी आहे. त्यामुळे अजूनही दोन्ही नद्या धोका पातळीवरुनच वाहत आहेत.
महामार्ग सुरु
दरम्यान, आठवड्याभरानंतर पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. आधी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे टँकर सोडल्यानंतर लहान वाहनेही पुलावरुन सोडण्यात आली. रविवारी रात्री 7-8 टँकर बेळगावच्या दिशेने सोडले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी 9 वाजता अवजड वाहने बेळगावच्या दिशेने सोडली. मग हळूहळू पाणी कमी झाल्यानंतर पुण्याच्या दिशेनेही वाहने सोडण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला.
पुन्हा पावसाचा इशारा
पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या दोन दिवसांत या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचेर संकेत आहेत.त्यामुळे पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये धाकधूक वाढली आहे.
स्थलांतरित नागरिकांची आकडेवारी
पूरग्रस्त भागातून एकूण 4 लाख 41 हजार 845 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. यात सांगलीतील 1 लाख 58 हजार 970, कोल्हापूरमधील 2 लाख 45 हजार 229, सातारामधील 10 हजार 486, सोलापूरमधील 26 हजार 999 नागरिकांचा समावेश आहे.
40 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू
पश्चिम महाराष्ट्रातील महापुरात मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 40 वर पोहचली आहे. याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी रविवारी (11 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती दिली.
संबंधित बातम्या
पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीत येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा
कोल्हापुरात सकाळी काढलेला जमावबंदीचा आदेश रात्री मागे
‘तक्रारी करुन काही होणार नाही, ए गप्प’, चंद्रकांत पाटलांनी पूरग्रस्ताला झापलं!