निवडणूक कधी लागणार? राष्ट्रवादी किती जागा जिंकणार?; अजित पवार गटाच्या मंत्र्याचं विधान चर्चेत
Sanjay Bansode on Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने निवडणुकीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. निवडणूक कधी होणार याबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलंय. वाचा सविस्तर...
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. राज्याची विधानसभेची निवडणूक कधी होणार? याची चर्चा होतेय. अशात राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी महत्वाचं विधान केलं आहे. निवडणूक लावण्याचा आणि आचारसंहिता लावण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. पण ऑक्टोबरच्या दहा ते पंधरा तारखेपर्यंत आचारसंहिता लागेल, असं आम्ही भाकीत करतो. नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल, असा अंदाज आहे. मात्र सर्वाधिकार निवडणूक आयोगाला असते. निवडणूक आयोग तारीख घोषणा करेल तेव्हा आपल्याला कळणार आहे, असं बनसोडे म्हणालेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट किती जागा लढवेल? यावरही त्यांनी भाष्य केलंय. हे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातील. मात्र जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला सांगू शकतो की आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असं बनसोडेंनी म्हटलंय.
शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात अनेक भागात नुकसान झालं. शेती पाण्याखाली गेल्याने पिकं वाहून गेलीत. अशात बळीराजा सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांना मदत करणं ही सगळी प्रक्रिया असते. सगळी प्रक्रिया पूर्ण करून चार दिवसाच्या आत अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या. कॅबिनेटमध्ये तो निर्णय होऊन लवकरात लवकर मदत जाहीर होईल. कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आले. मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत जाऊन शेती बांधावर पाहणी केली. एका जिल्ह्यात दोन मंत्री फिरणं योग्य नव्हतं. म्हणून मी लातूर जिल्ह्यात पाहणी केली, असं संजय बनसोडे म्हणाले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाबाबत काय म्हणाले?
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. यावरही संजय बनसोडे यांनी भाष्य केलंय. सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो. सर्व हुतात्म्यांना अभिवादन, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. त्याचा आढावा बैठक घेतली. 4 दिवसाच्या आत अहवाल पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. पालकमंत्री म्हणून जास्ती जास्त मदत मिळेल त्या अनुषंगाने प्रयत्न करेन. धनंजय मुंडे, अनिल पाटील आज परभणी जिल्ह्यात आले होते. आज ध्वजारोहण झाल्या झाल्या इथं बैठक घेऊन मी माहिती घेतली, असं ते म्हणाले.