“रवी राणा यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, झोपेतून उठतानाही ते बडबडत उठत असतील”
ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका केलीय. काय म्हणालेत? वाचा...
कोल्हापूर : “रवी राणा यांच्या डोक्यावर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. रवी राणा झोपेत बडबडत उठत असतील. ठाकरे कुटुंबाचं काम मुंबईकर कधी विसरणार नाहीत. रवी राणा (Ravi Rana) यांचं हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे”, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली आहे.
भाजप शिंदे गटाविरोधात षड्यंत्र रचत आहे. भविष्यात आम्हाला काहीही करायची गरज नाही. महाराष्ट्राची जनताच भाजपचा करेक्ट कार्यक्रम करेल, असंही संजय पवार म्हणालेत.
मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कार्यालयावरून काल राडा झाला.शिंदेगटाने या कार्यालयावर ताबा मिळवला. त्यावर रवी राणा यांनी भाष्य केलं आणि ठाकरे गटावर टीका केली.
“एकनाथ शिंदे लवकरच शिवसेना भवनाचाहीही ताब्यात घेतील. त्यांच्याकडे बहुमत आहे त्यामुळे कायदेशीर शिवसेना भवन त्यांना मिळेल. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची हत्या केलये. त्यामुळे शिवसेना भवनवर एकनाथ शिंदेचा हक्क आहे. ठाकरेंना शिवसेना भवनची चावी ही शिंदेंना द्यावी लागेल. कारण 80 टक्के नगरसेवक लवकरच शिंदेगटात येतील”, असं रवी राणा म्हणालेत. त्यावर आता संजय पवार यांनी टीका केली आहे.
सत्ता परिवर्तनानंतर महाराष्ट्राची वाटचाल उत्तर प्रदेश-बिहारच्या दिशेने सुरू आहे. कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात कुणी राखणार आहे की नाही? नागपूरमध्ये अधिवेशनासाठी आमचे आमदार, प्रमुख नेते असताना हा लपून हल्ला कशासाठी केला, असा सवाल संजय पवार यांनी केलाय. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कार्यालयावरून झालेल्या राड्यावर ते बोललेत.
उद्धव ठाकरे यांचं तोंड तुम्ही बंद करू शकणार नाही. कार्यालय बंद केलं तर तुमचं मुंबईतील-महाराष्ट्रातील तुमची दुकान बंद होणार आहेत. जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असं संजय पवार म्हणालेत.
नितेश राणे उद्धव ठाकरेंवर आरोप करतात त्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. कोकणापुरतं मर्यादित राहिलेल्यांनी महाराष्ट्रावर बोलू नये. ठाकरेंवर बोलण्याची तुमची योग्यता नाही, असं म्हणत संजय पवार यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे.