बलात्काराची तक्रार केली अन् त्याच दिवशी कोयत्याने तिची बोटं कापली, त्याला फाशी द्या, बार्शीतल्या कुटुंबाची मागणी
बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील या घटनेचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले होते. संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर या घटनेची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
सागर सुरवसे, सोलापूर | शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटने राज्यात खळबळ उडवून दिलेली आहे. बार्शी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर हल्ला झाल्याचं हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. सदर घटनेतील दोषींना फाशी द्या अन्यथा आम्हालाच इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे. बार्शीत भाजप पुरस्कृत गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. 5 मार्च रोजी झालेल्या या हल्ल्यानंतर आजपर्यंत आरोप मोकाट आहेत, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय. ही मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका, असा इशारा राऊत यांनी दिलाय. संजय राऊत यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय. त्यामुळे बार्शीतील ही घटना चर्चेत आहे.
ती घटना बळेवाडीतली…
बार्शी तालुक्यातील बालेवाडी येथील 5 मार्च रोजीची ही घटना आहे. पारधी कुटुंबातील ही अल्पवयीन मुलगी संध्याकाळी शिकवणी झाल्यानंतर घरी निघाली होती. रेल्वे गेटजवळ दोन तरुणांनी अडवून तिच्यावर बलात्कार केला होता. त्याच दिवशी संध्याकाळी त्या मुलीने पालकांसह बार्शी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तताडीने त्या आरोपींना तातडीने अटक केली असती तर पुढील घटना घडली नसती, अशी चर्चा सुरु आहे. त्या मुलीच्या तक्रारीमुळे आरोपींनी संध्याकाळी जाऊन तिच्यावर सत्तूर आणि कोयत्याने वार केले. यात ती मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहे. ५ मार्च रोजी रात्री घटलेल्या या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ?५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.@Dev_Fadnavis pic.twitter.com/E5Bef1sDPb
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 18, 2023
‘त्याला फाशी द्या…’
या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. जर त्यांना तीन महिन्यात फाशी झाली नाही तर सरकारने आम्हाला इच्छा मारणाची परवानगी द्यावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही वारंवार पोलिसात आरोपीविरोधात तक्रार देऊनही आम्हालाच पोलिसांनी दमबाजी केली. सुरवातीला मुलीवर अत्याचार झाल्यावर आम्ही तालुका पोलिस स्टेशनला गेलो तेव्हा हे आमच्या हद्दीत येत नाही असे सांगत आम्हाला परत पाठवले. त्यानंतर आरोपी आमच्या घरी येऊन माझ्या मुलीवर कोयत्याने वार केले आणि तिची बोटे कापली. आमच्या विरोधात तक्रार देतेस का आता तुला सोडत नाही. तसेच आता तुझ्या आईचा कार्यक्रम करायचा आहे… आम्ही पोलिसांकडे गेल्यावर त्यांनी वेळीच आरोपीला रोखले असते तर आमच्या मुलीचे वाटोळे झाले नसते, अशी तक्रार कुटुंबियांनी केली आहे.
विधान परिषदेत पडसाद
बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील या घटनेचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले होते. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण तर वाढत आहेच पण आरोपींना मोकाट सोडल्याने पिडीत मुलीच्या कुटुंबियारही हल्ला झाला. यावरुन गृहखाते नेमके काय करते? या खात्याचा कारभार कसा सुरु आहे? याचा पाढाच आ. सचिन आहेर यांनी वाचून दाखवला होता. मुलीच्या तक्रारीवरून तत्काळ कारवाई न केल्यामुळे बार्शी शहरासह तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई झाल्याचं वृत्त आहे.