संजय राऊत म्हणतात, लवकरच स्फोट होणार, मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप, काय आहे नेमकं प्रकरण?
सरकारमधील अनेक मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराची एकूण १७ प्रकरणं माझ्याकडे आहेत, असा दावा संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. आता मालेगावातील कॅबिनेट मंत्री, शिवसेना नेते दादा भुसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत.
मनोहर शेवाळे, मालेगाव : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे बार्शीचं (Barshi) ट्विट करून अडचणीत आले आहेत. यातच आता त्यांनी मालेगावातील मंत्री दादा भुसेंवरही पुढचा निशाणा साधला आहे. सोमवारी रात्री त्यांनी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव येथील गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रुपयांचे शेअर्स गोळा केल्याचा गंभीर आरोप भुसे यांच्यावर करण्यात आला आहे. कंपनीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा करण्यात आलेत. मात्र प्रत्यक्ष कंपनीच्या वेबसाइटवर कमी शेअर्स दाखवण्यात आले आहेत. ही थेट जनतेची लूट आहे, अशा शब्दात राऊत यांनी दादा भुसे यांना इशारा दिला आहे.
संजय राऊत यांचं ट्विट काय? संजय राऊत यांनी सोमवारी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या गिरणा अॅग्रो कंपनीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाय. एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अग्रो नावाने178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे.लवकरच स्फोट होईल… विशेष म्हणजे इन्फोर्समेंट डायक्टरेट अर्थात ईडी आणि देवेंद्र फडणवीस यांना राऊत यांनी टॅग केलंय. त्यामुळे हा स्पष्टपणे फडणवीस यांना दिलेला इशारा समजला जातोय.
हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अग्रो नावाने178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे.लवकरच स्फोट होईल.@dir_ed@Dev_Fadnavis pic.twitter.com/fYuLIZEhEL
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 20, 2023
मालेगावात चर्चांना उधाण संजय राऊत यांच्या ट्विटनंतर दादा भुसे यांच्यासंदर्भातील गिरणा अॅग्रो कंपनीवरून जोरदार चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांना दादा भुसे यांच्यावर उघड टीका करायला सुरुवात केली आहे. कधीकाळी मालेगावचे वैभव असलेल्या गिरणा सहकारी साखर कारखाना सध्या बंद अवस्थेत असून काही वर्षांपूर्वी अवसायनात निघालेला हा साखर कारखाना वाचवण्यासाठी गिरणा बचाव समितीच्या माध्यमातून शेअर्सच्या स्वरुपात तालुक्यातील शेतक-यांकडून रक्कम गोळा करण्यात आली होती. त्यावेळी विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेतला होता. आता या प्रश्नांवरून संजय राऊत यांनी भुसे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी जमा केलेल्या रकमेत पालकमंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.