‘एकीकडे कोरटकरला अभय तर दुसरीकडे…’, कुणाल कामरा प्रकरणात राऊतांचा पुन्हा हल्लाबोल
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिका केली आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिका केली आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली. कुणाल कामरानं माफी मागावी अन्यथा त्याला रस्त्याने फिरू देणार नाही असा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
भारतीय जनता पार्टीशी संबंधित सर्व गुन्हेगारांना पोलिसांचं संरक्षण आहे. कोरटकरला देखील आहे. शिवरायांचा अपमान करणारी ही व्यक्ती आहे. काल रात्री कुणाल कामराच्या ऑफिसची तोडफोड केली. काही लोकांना वाटतं त्याने एकनाथ शिंदे यांचा अपमान केला. मला एक कळत नाही प्रशांत कोरटकर प्रकरणावर सगळे गप्प आहेत, कोणीच बोलत नाहीत. पण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान झाला म्हणून कार्यालय तोडलं जातं आणि राज्याचे मुख्यमंत्री दंगलखोरांची बाजू घेतात.
या राज्यात असं पहिल्यांदा होत आहे. कुणाल कामरा चुकला असेल तर त्याच्यावर कायद्यानं कारवाई व्हावी, पण इथे राज्याचे मुख्यमंत्री दंगलखोर गुंडगिरी करणाऱ्या लोकांची बाजू घेत आहेत. तर कुणाल कामरा याला एकनाथ शिंदे यांची माफी मागायला सांगत आहेत, प्रशांत कोरटकरला अभय मिळालं त्यामुळेच तो महिनाभर बाहेर होता, जामिनाच्या प्रयत्नतात होता. महाराष्ट्रातून पळून गेला असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान मुंबईच्या रस्त्यांवरून देखील त्यांनी हल्लाबोल केला आहे. मुंबईतील रस्त्यांच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, यावर आदित्य ठाकरे बोलत आहेत. मी पण बोलेल. मुंबईची या लोकांनी काय अवस्था केली हे आदित्य ठाकरे उत्तमरित्या सांगू शकतात, कोणताही गद्दार आमच्या डोळ्यात डोळे भिडवून पाहू शकत नाही, असा हल्लाबोल यावेळी राऊत यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. दरम्यान कुणाल कामराच्या या व्हिडीओमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.