ती वकील होती, वाचन, निरीक्षण उत्तम होतं, तिचा मृत्यू अस्वस्थ करणारा, ठाण्यातील ‘दुर्दैवी’ घटनेनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
काल ठाण्यातील मोर्चात घोषणा देत असतानाच दुर्गा भोसले-शिंदे यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
ठाणे : ठाण्यातील रोशनी शिंदे यांना मारहाण प्रकरणात पोलीस आयुक्त आणि सरकारविरोधात काल जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात काढलेल्या या मोर्चात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्या दुर्गा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला. वरिष्ठांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरु असतानाच रात्री दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ठाकरे गटातील शिवसेनेसाठी ही अत्यंत वेदनादायी घटना असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. दुर्गा भोसले या राजकीय कार्यकर्त्या म्हणून अत्यंत सक्रिय होत्या. उत्तम वाचक होता तर त्यांची निरीक्षण क्षमताही चांगली होती, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
काय म्हणाले राऊत?
दुर्गा भोसले यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ‘ दुर्गा भोसले या युवासेनेच्या सक्रिया कार्यकर्त्या होत्या. जिथे जिथे अन्याय आहे, तिथे तिथे त्या होत्या. तरुण पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आम्हाला सगळ्यांना अस्वस्थ करणारी घटना होती. ती वकील होती. वाचन चांगलं होतं. निरीक्षण उत्तम होतं. अनेकदा फोनवर किंवा भेटीत तिच्या वागण्या-बोलण्यातून ती छाप पाडायची. आम्ही सगळेच तिच्या निधनानंतर दुःखात आहोत, अशा शब्दात राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
काल ठाण्यातील मोर्चात घोषणा देत असतानाच दुर्गा भोसले-शिंदे यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. दुर्गा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंतिम संस्कार करण्यात येतील.
भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर का घेतायत?
भाजपने आपल्या पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेतलं असून त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाहीत, असा आरोप राऊत यांनी केला. ते म्हणाले, ‘ मी स्वतः गेल्या पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय कडे या राज्यातले दोन प्रकरण पाठवलेत. 500 कोटी मनी लाँडरींग प्रकरण आहे. भीमा पाटस साखर सहकारी कारखान्याचं. भाजप आमदार राहुल कुल सध्याचे गृहमंत्री यांचे राईट हॅन्ड यांचा तो कारखाना आहे. त्यांनी ५०० कोटी कसे बुडवले हे सगळं पुराव्यासह पाठवलं आहे, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्याच प्रमाणे दादा भुसे यांनी गिरणा अॅग्रो सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे शेअर्स गेतले पण साखर कारखानाही चालला नाही. हे पैसे गेले कुठे , असा सवाल राऊत यांनी केलाय.
खरा भाजप आम्ही पाहिलाय..
भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. आजचा हा खरा भाजप नाहीये. स्थापनेवेळचा भाजप आम्ही पाहिलाय, असं राऊत म्हणाले. आज त्यांना देशात एकच आणि एकमेव पक्ष ठेवायचा आहे. यालाच हुकुमशाही म्हणतात. भाजपचा स्थापना दिवस आम्हाला माहिती आहे. ज्या भाजपची स्थापना झाली आणि आजचा दिवस यात फरक आहे. हुकुमशाहीविरोधात तो जनता पक्षातही विलीन झाला. आज जे तिथे कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्यातले ९० टक्के लोक बाहेरून वॉशिंग मशीनमधून धुऊन निघालेले फडके आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.