तेव्हा गौरव यात्रा का काढली नाही ? तुमचा स्वाभिमान कुठे गेला होता ? संजय राऊत भडकले…
ज्यांच्या हृदयात सावरकर आहेत त्यांनी सावरकर याना उस्फुर्त मानवंदना दिली पाहिजे. पण, ते उपमुख्यमंत्र्यांना विचारता वाचून दाखवू का ? याला गुलामी म्हणतात.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी ज्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. त्यावेळी तुम्ही त्यांची पाठराखण केली. तेव्हा गौरव यात्रा का काढली नाही. तुमचा स्वाभिमान कुठे गेला होता असा थेट सवाल केला.
हे ढोंग आहे. मुळात सावरकर आणि भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवाराचा काही संबंध नाही. संघ परिवाराने कायम सावरकरांना शत्रू मानले. काल मुख्यमंत्री बोलताना एक कागद होता समोर तो वाचून दाखवत होते. ज्यांच्या हृदयात सावरकर आहेत त्यांनी सावरकर याना उस्फुर्त मानवंदना दिली पाहिजे. पण, ते उपमुख्यमंत्र्यांना विचारता वाचून दाखवू का ? याला गुलामी म्हणतात. गुलामी विरोधात सावरकर यांनी संपूर्ण आयुष्य अंदमानात घालविले. हे सत्ताधाऱ्यानी समजून घेतले पाहिजे.
अदानी बचाव यात्रा
सावरकर गौरवयात्रा असे नाव असले तरी ती अदानी बचाव यात्रा आहे. गौतम अदानी यांच्या प्रश्नावरून लक्ष विचलित व्हावे म्हणून सावरकर यांच्या मुखवट्याखाली ही यात्रा काढत आहेत. सावरकर हे क्रांतिकारक होते. त्यामुळे त्यांच्या आडून अदानीला वाचविण्याचा हा प्रयत्न आहे. आम्हाला सावरकर यांच्याविषयी आदर आहे. आम्हाला या ढोग्यांनी सावरकर सांगायचा प्रयत्न करू नये.
मुख्यमंत्री शिंदे यांना काही प्रश्न
शिवतीर्थ आहे त्याच्या बाजूला सावरकर स्मारक आहे. त्या उभारणीत बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान आहे. सावरकर यांचे हिंदुत्व आम्ही स्वीकारले आहे. ते शेंडी जानव्याचे नाही तर विज्ञानवादी हिंदुत्व आहे. ते भाजपाला मान्य आहे का ? मुख्यमंत्री यांना विचारा की त्यांना सावरकर यांच्या क्रांतिकारी तीन बंधूंची माहिती आहे का? त्यांचा जन्म कुठे झाला माहिती आहे का ? सावरकरांच्या महान पत्नीचे नाव माहिती आहे का ? सावरकरांचे जन्मठेप, सहा सोनेरी पाने कधी वाचले आहे का ? असा सवाल त्यांनी केला.
तेव्हा तुमचा स्वाभिमान कुठे गेला होता ?
आता मुख्यमंत्री सावरकरांचा अपमान झाला म्हणून गौरव यात्रा काढतात. पण, भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. तेव्हा, शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची गौरव यात्रा काढावीशी वाटली नाही ? फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल स्वाभिमान नाही ? का तुम्हाला का वाटलं नाही की त्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची गौरव यात्रा महाराष्ट्रात काढावी. भाजपचे हे ढोंग आहे अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.