तुम्ही नवीन होता तुम्हाला काय दिलं नाही, सगळं काही देऊनही तुम्ही गेलात म्हणजे…संजय राऊत यांचा कुणावर निशाणा?
संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेल्या अजय बोरस्ते यांच्यावर बोल करत असतांना जहरी टीका केली आहे, त्यामध्ये अजय बोरस्ते यांच्या डीएनएवर भाष्य केलं आहे.
नाशिक : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहे. ठाकरे गटातील जवळपास पन्नासहून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहे. याशिवाय गोल्फ क्लब मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याने त्याचे नियोजन करण्यासाठीही संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांना कचरा म्हणत टीका केली आहे. याच दरम्यान त्यांनी अजय बोरस्ते यांच्यावरही निशाणा साधला आहे. अजय बोरस्ते यांना महानगरप्रमुख पद, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता अशी सगळी पदं देऊनही ते का गेले? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी हल्लाबॉल केला याचवेळी त्यांनी अजय बोरस्ते यांचे नाव न घेता सगळं देऊनही जर तुम्ही जाणार असेल तर तुमच्या डीएनएचा प्रॉब्लेम आहे अशी टीकाच खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
यापूर्वी संजय राऊत यांनी अजय बोरस्ते यांनी प्रवेश केला त्यावेळी दलाल, मटके आणि दारूचे अड्डे चालवणारे गेले अशी टीका केली होती.
त्यानंतर अजय बोरस्ते यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच राऊत हे राष्ट्रवादीचे दलाल असल्याचे म्हंटले होते.
त्यानंतर संजय राऊत यांनीही त्यावर फारसे भाष्य केले नव्हते, मात्र शिंदे गटात नुकतेच झालेले प्रवेश हे अजय बोरस्ते यांनी घडवून आणले होते.
कचरा आणि दलाल म्हणत संजय राऊत यांनी अजय बोरस्ते यांचा डीएनएच काढला असून यावर अजय बोरस्ते यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.