कोल्हापूर : शाहू छत्रपतींची आत्मियतेने भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शाहू छत्रपतींशी फोनवरून चर्चा केली, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राईत शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati) महाराजांच्या भेटीला आले. न्यू पॅलेस इथे ही भेट झाली आहे. संभाजीराजेंच्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णयामागे भाजपा असू शकतो, अशी शाहू महाराजांनी काल शक्यता वर्तवली होती. शाहू महाराजांच्या या भूमिकेचे शिवसेना आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून स्वागत करण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची होती. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकारण झाले. आरोप-प्रत्यारोप झाले. याविषयी संभाजीराजेंच्या (Sambhajiraje Chhatrapati) समर्थकांनी उद्धव ठाकरे, शरद पवार तसेच एकूणच महाविकास आघाडीवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपतींनी मांडली होती.
मागील दोन दिवसांपासून संजय राऊत कोल्हापुरात आहेत. शिवसेनेचे संपर्क अभियान सुरू असून त्यानिमित्त ते याठिकाणी आले आहेत. आम्हाला छत्रपती शांहूंविषयी आदर आहे, संभाजीराजेंविषयी आदर आहे. कोल्हापूरच्या मातीत प्रामाणिकपणा आणि सत्य जिवंत आहे. शाहू घराण्याने आपली सत्यवादी परंपरा कायम ठेवली. मी कोल्हापूरला आहे. शाहू महाराजांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेईल. तर यात राजकारण करून यावरून आम्हाला लक्ष्य करणाऱ्यांची उडी फसलेली आहे. आम्ही त्यांना शिवसेना पक्षातर्फे लढण्याचे आवाहन केले होते, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी शाहू छत्रपतींच्या भेटीअगोदर प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान संजय राऊत यांच्यासोबत संजय पवारदेखील शाहू छत्रपतींच्या भेटीला आले होते.
उद्धव ठाकरेंचा सकाळीच फोन आला, की कोल्हापुरात आहात, तर आधी महाराजांचे आशीर्वाद घ्या आणि मलाही बोलायचे आहे. ठाकरे कुटुंब आणि महाराजांचे एक नाते आहे. उद्धव ठाकरे स्वत: कोल्हापुरात येवून भेट घेणार आहेत. विविध सामाजिक कामात सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी बोलून दाखवली, असे संजय राऊत म्हणाले. या घराण्याविषयी आत्मियता आहे. प्रबोधनकार ठाकरेंपासूनचे हे नाते आहे. यात कोणतेही राजकारण नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.