उद्योगपती गौतम अदानी हे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. तेव्हाच आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्राचा लचका तुटला जाणार आहे. तो आता जकात नाक्याच्या रूपाने तुटला जात असल्याचं आपण पाहत आहोत. कोण आहेत गौतम अदानी? याआधी जकातनाके महाराष्ट्राने चालवले. पण आता ते अदानींनाच का दिले जात आहेत? कुणाच्या दबावाखाली आपण काम करताय. अदानींना हा सगळा महाराष्ट्र गिळता यावा, म्हणून तुम्ही गैर मार्गाने सत्तास्थापन केली, असं संजय राऊत म्हणालेत.
उद्योगपती गौतम अदानी यांनी काल सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये दीडतास चर्चा झाली. या भेटीवरून राऊतांनी घणाघात केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र अदानीच्या घशात घालायचा आहे. यांची लायकी बघा यांना जकात नाके चालवायचे आहेत… विमानतळ, जकात नाके, भाजी दुकान हे सगळ अदानी चालवत आहेत. आम्ही आता आवाज उठवायचा नाही का? काल अदानी फडणवीस यांना भेटले तेव्हाच लक्षात आलं, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
सत्ताधारी सभागृह चालू देत नाही हे फार आश्चर्यकारक आहे. सभागृह चालू देण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. गौतम अदानी विषय हा कोणाचं व्यक्तिगत विषय नाही. अमेरिकेच्या न्यायालयाच्या नुसार आम्ही अडाणी मुद्यावर बोलायला उभे राहिलो तर आम्हाला बोलू देत नाहीत. आता जॉर्ज सोरेस वर सभागृह चालू देत नाहीत. भारताच्या इतिहासात अशा घटना कधी घडल्या नाहीत. विरोधी पक्षाची अवहेलना करायची ही कुठली लोकशाही आहे? राज्यसभा सभापती पक्षपातीपणा करत आहेत. आमच्याकडे अविश्वास ठराव मांडण्याशिवाय पर्याय नव्हता, असं संजय राऊत म्हणालेत.
माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये काल महायुतीच्या नेत्यांची सभा झाली. यात माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, जतचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे या सभेला उपस्थित होते. यावेळी बोलताना खोत आणि पडळकरांनी शरद पवार यांच्यावर जहरी शब्दात टीका केली. या टीकेचा संजय राऊतांनी समाचार घेतला. शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्या बद्दल अशी विधान शोभतात का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं की त्यांना ही भाषा वापरायला त्यांनी सांगितली आहे का? कोकणातील टिल्लू गब्बर सिंग अशी भाषा वापरतात. हे राज्याला शोभणार नाही, असं म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.