आमदार प्रकाश सुर्वे गप्प का? शीतल म्हात्रे Video प्रकरणावरून संजय राऊत यांचा सवाल
Sanjay Raut News | संजय राऊत यांनी शीलत म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी महत्त्वाची भूमिका मांडली आहे.
नवी दिल्ली | शिंदे समर्थक शिवसेना (Shivsena) नेत्या शीतल म्हात्रे (Shital Mhatre) यांचा व्हायरल होणारा व्हिडिओ खरा आहे की खोटा, याचा आधी तपास घ्या. त्यानंतर त्यात मॉर्फिंग झालंय की आणखी काही, हे बघा. नंतरच लोकांना ताब्यात घ्या, अटक करा, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. नवी दिल्लीत आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर ठाकरे गटासंबंधी काही लोकांना ताब्यातदेखील घेण्यात आलंय. तर काही नेत्यांनी या प्रकरणात थेट कलानगरातील नेत्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केलाय. संजय राऊत यांनी या प्रकरणावरून शिंदे-भाजप सरकारवर आज जोरदार ताशेरे ओढले. तसेच या प्रकरणात महिलांची बदनामी होत असेल तर पुरुषाचीही बदनामी होतेय. मग आमदार प्रकाश सुर्वे यांची नेमकी भूमिका काय, ते कुठे आहेत, असा सवाल राऊत यांनी केलाय.
कुठे आहेत प्रकाश सुर्वे?
मुंबईतील एका रॅलीदरम्यानचा आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतोय. हे ठाकरे गटाच्या लोकांचं कटकारस्थान असल्याचा आरोप म्हात्रे तसेच काही भाजप नेत्यांनी केलाय. मात्र प्रकाश सुर्वे यांनी अद्याप कुणावरही आरोप केलेले नाहीत किंवा त्यांची भूमिकाही स्पष्ट झालेली नाहीय यावरून संजय राऊत यांनी सवाल विचारला आहे. ते म्हणाले, मी इथे दिल्लीत आहे. तो व्हिडिओ खरा की खोटा हे आधी शोधा. मग मॉर्फिंग झालंय की अजून काय झालं, त्याचा तपास करा. पुरुष आमदाराची तक्रार आहे का, हेही पहावं लागेल. ते कुठे आहेत? त्यासंदर्भात पुरुषाचीही बदनामी झाली आहे.
बदनामी पुरुषाचीही होते. मिंधे गटाच्या महिला म्हणतायत बदनामी होतेय. देशभरात ही चित्रफीत व्हायरल होतेय. लाखो-कोट्यवधी लोकांपर्यंत स्थापन होतेय. मग देशातील सगळ्याच लोकांना अटक करणार का? एसआयटी स्थापन होण्यासारख्या अनेक घटना घडतायत. महिलांची बदनामी होऊ नये, असं आमचं मत आहे. महिलांबाबत सभ्य शब्द आणि भूमिका वापरली पाहिजे. काही गोष्टी सूडाने कारवाया करत असतील तर त्याला राजकीय वृत्तीतून उत्तर मिळेल.
भाजपची वॉशिंगमशीन बिघडेल…
सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई हे शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत शामिल झाले. त्यावरूनही संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘ सुभाष देसाई हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे चिरंजीव नाहीत. काल देसाईंनी त्यासंदर्भात सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले आहेत. त्या मुलाचा शिवसेनेशी संबंध नाही. पण मिंधे गट कधी बाप पळवतात, आता मुलंही पळवायला लागलेत. ही मेगा भरती सुरु आहेत, ती कुचकामी आहे. पण एक दिवस भाजपची वॉशिंग मशीन बिघडेल.
मिंधे गटातले एक मंत्री , सामंत लोणीवाले….
उदय सामंत यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, ‘सामंत लोणीवाले यांनी काही महिन्यांपूर्वी या चिरंजीवावर काही आरोप केले होते. हेच ते. त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. असंही सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वी कोकणातले सामंत लोणीवाले यांनी आरोप केले होते, त्याचं काय झालं, याचं आधी उत्तर द्या. मग आम्ही उत्तर देऊ… सुभाष देसाई हे ज्येष्ठ आणि आदर्श नेते आहेत. चिरंजीवांनी पक्षातून बाहेर पडणार असले तरी ते पक्षात कधी नव्हतेच. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही. भविष्यात या ओझ्याचं काय करायचं, हा सगळा प्रश्न त्यांच्यासमोर असेल. वॉशिंग मशीन बिघडेल, इतका कचरा ते आत टाकतायत..