“महाराष्ट्र हळहळला, पण शिवरायांच्या अपमानाविरुद्ध पेटून का उठला नाही?” संजय राऊतांचा सवाल
भ्रष्ट मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांनी आधी राजीनामा द्यायला हवा. सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्यांनी पुन्हा पाय ठेवू नये. त्यांच्या भ्रष्टाचाराचा फटका छत्रपतींनाच बसला, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.
Sanjay Raut Rokthok : ‘लाडक्या ठेकेदारांना काम द्या व कमवा’ अशी नवी योजनाच मुख्यमंत्र्यांनी सुरू केली. त्या योजनेतून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजही सुटले नाहीत. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुतळ्यास भ्रष्टाचाराने पोखरले व तो पुतळाच कोसळून पडला, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली. सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणानंतर आता विरोधक आक्रमक झाले आहेत.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तापत्राच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी संजय राऊतांनी सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांनी आधी राजीनामा द्यायला हवा. सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्यांनी पुन्हा पाय ठेवू नये, अशी मागणीही केली. तसेच महाराष्ट्र हळहळला, पण शिवरायांच्या अपमानाविरुद्ध पेटून का उठला नाही, असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला.
संजय राऊत काय म्हणाले?
सिंधुदुर्गाच्या ‘जंजिरे’ राजकोटवरील छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा अक्षरश: कोसळून पडला. छत्रपतींच्या पुतळ्याचे ते उद्ध्वस्त अवशेष पाहून महाराष्ट्राच्या हृदयाची शकले झाली. औरंगजेबाने महाराष्ट्रावर स्वारी करताना मंदिरे तोडली, देवांच्या मूर्ती तोडल्या व ते भग्न अवशेष पाहून महाराष्ट्र पेटून उभा राहिला. शिवरायांच्या पुतळ्याचे अवशेष पाहून महाराष्ट्र अस्वस्थ झाला, पण पेटून का उठला नाही? असा प्रश्न पडतो, असे संजय राऊत म्हणाले.
शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना खुद्द महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून व्हावी यासारखे दुर्दैव ते कोणते! महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची लाट उसळली आहे. सर्वच कामांत पैसे खाल्ले जातात. भ्रष्टाचार करून पैसे खाण्यासाठी मुख्यमंत्री शेकडो कोटींचा निधी आपल्या माणसांना देतात. ‘लाडक्या ठेकेदारांना काम द्या व कमवा’ अशी नवी योजनाच मुख्यमंत्र्यांनी सुरू केली. त्या योजनेतून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजही सुटले नाहीत. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुतळ्यास भ्रष्टाचाराने पोखरले व तो पुतळाच कोसळून पडला, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
“अद्याप एकही वीट रचली गेलेली नाही”
सिंधुदुर्ग किल्ल्याने केलेला आाक्रोश महाराष्ट्राचे काळीज चिरत आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. येथेही सत्ताधाऱ्यांच्या लाडक्या माणसांनी पैसे खाल्ले. हा विषय गंभीर आहे. मोदी-फडणवीसांनी उभे केलेले शिवरायांचे पुतळे पडले. यांना मुंबईच्या अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक उभे करायचे होते व त्याचे समुद्रातील पूजनही अशाच पद्धतीने गाजावाजा करीत मोदींच्या हस्ते केले. त्या अरबी समुद्रातील स्मारकाची अद्याप एकही वीट रचली गेलेली नाही व आता सिंधुदुर्गावरील महाराजांचा पुतळा कोसळून पडला, असेही संजय राऊत म्हणाले.
“भ्रष्टाचाराचा फटका छत्रपतींनाच”
राजकोटावर घाईघाईने उभारलेला शिवरायांचा पुतळा हा राजकीय फायद्यासाठीच होता. त्यातील ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले व सिंधुदुर्गातील लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारात वापरले हे आता स्पष्ट झाले. याच पैशांतून कुडाळ, मालवण, कणकवलीत मते विकत घेण्यात भाजपचे पुढारी व मंत्री पुढे होते. त्या भ्रष्ट मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांनी आधी राजीनामा द्यायला हवा. सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्यांनी पुन्हा पाय ठेवू नये. त्यांच्या भ्रष्टाचाराचा फटका छत्रपतींनाच बसला, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.
सिंधुदुर्ग किल्ला 400 वर्षे उभा आहे, पण गंजलेल्या खिळ्यांमुळे किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा उन्मळून पडला. हा संकेत चांगला नाही. महाराष्ट्र चारही बाजूने लुटला जातोय. महाराष्ट्राचे ‘सुरत’प्रेमी राज्यकर्ते छत्रपती शिवरायांच्या नावानेच लूट करीत आहेत. त्याच लुटीतून बांधण्यात आलेल्या सिंधुदुर्गातील राजकोटावरील ज्या चौथऱ्यावर महाराज उभे होते, तो चौथराच डळमळला आणि महाराष्ट्राचे वैभव, मानसन्मान, शौर्यच जणू कोसळले, असेही संजय राऊत म्हणाले.