इथे न्याय मिळण्याची शक्यता कमीच, संजय राऊत यांनी कोणत्या प्रकरणातून आशा सोडली?
Sanjay Raut News | ज्या प्रकरणात तक्रारदारच न्यायाधीशाच्या भूमिकेत असतील तिथे न्यायाची अपेक्षा कमीच आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
मुंबई : राज्यातील लोकशाही (Democracy) व्यवस्थेची हत्या होतेय, आता फक्त न्यायव्यवस्थेकडूनच आशा आहे, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याआधीही केलंय. मात्र एका प्रकरणात न्याय मिळण्याची आशा नाही, असं संजय राऊत म्हणालेत. हे प्रकरण आहे, संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावाचे. विधीमंडळ नव्हे हे चोरमंडळ आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी १ मार्च रोजी कोल्हापुरात बोलताना केलं होतं. त्यावरून राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. हक्कभंग समितीने पाठवलेल्या नोटिशीला संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. मात्र या प्रकरणी न्यायाची आशा फार कमी आहे, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय.
काय म्हणाले संजय राऊत?
ज्या फुटीर आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ते हक्कभंग समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे हे सगळं ठरवून झालंय. इथे न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे. मी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटलं नाही. शिवसेनेतून जे फुटून गेलेत, त्यांना चोरमंडळ म्हटलंय.
ते आंदोलन मी पुढे घेऊन जाणार…
हक्कभंग समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांच्याविरोधातील शेतकरी आंदोलन मी पुढे घेऊन जाणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिलाय. ते म्हणाले, ‘ हक्कभंग समितीला मी भूमिका मांडली. त्यावरून मला उत्तर द्यायचंय. हक्कभंग समितीत तक्रारदारालाच महत्त्व दिलंय. तेच न्यायाधीश होते. ज्यांनी तक्रार केली तेच न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत. ज्यांच्या साखर कारखान्यावरून मी भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, ते राहुल कुल हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत. भीमा पाटस साखर कारखान्यात ५०० कोटींचं मनी लाँडरींग झालंय. शेतकरी रस्त्यावर उतरलेत. ते आंदोलन मी पुढे घेऊन जाणार आहे.
गौतम अडानी या व्यक्तीला वाचवण्यासाठी अख्खं संसदेचं अधिवेशन संपवायला सरकार निघालंय. राहुल गांधींना बोलू दिलं जात नाही. संयुक्त संसदीय समितीची मागणी आम्ही करतोय, त्यावर कुणाला बोलू देत नाहीयेत. राहुल कुल, दादा भुसे यांच्या प्रकरणाकडे ढुंकुनही पहायचं नाही. विरोधकांच्या पाच पंचवीस रुपयांच्या प्रकरणावरून त्यांना त्रास द्यायचा, असे प्रकार चालले असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.
चुंबनावरून एसआयटी..
अमृता फडणवीस तसेच शीतल म्हात्रेंसारख्या प्रकरणात एसआयटी स्थापन होते, मात्र बार्शी येथील गरीब मुलीचं रक्त सांडलं तिथे काहीही कारवाई होत नाही, असा आरोप राऊत यांनी केलाय. ते म्हणाले, ‘ आपल्या कुटुंबातील व्यक्तीवरून एसआयटी स्थापन केली जाते. एका चुंबनाच्या व्हिडिओवरून एसआयटी स्थापन केली जाते. पण मी रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या एका मुलीचा फोटो ट्विट करून मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतो. ही या राज्याची कायदा, सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय, हे यावरून स्पष्ट दिसतंय, अशा शब्दात राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढले.