Sanjay Raut: 2024मध्ये कोण मसणात जाईल ते कळेलच, संजय राऊतांचं चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर
Sanjay Raut: संपूर्ण महाराष्ट्रात दोन टप्प्यात आम्ही शिवसंपर्क मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपासून कोल्हापूर हॉट झालं आहे. मी रोज पत्रकारांशी सकाळी बोलतो. जिथे असेल तिथे पत्रकारांशी बोलतो.
कोल्हापूर: तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा, असं बेताल विधान करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी तोफ डागली आहे. त्यांच्यावर संस्कारच तो आहे. त्यांची ती जी भाषा आहे, त्याला आम्ही विकृती म्हणतो. ते त्यांचं वैफल्य आहे. 2024 साली कोण मसणात जाईल ते कळेलच, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. संजय राऊत हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत कोल्हापुरात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. राऊत यांनी हा दौरा राजकीय नसून संघटनात्मक बांधणीसाठीचा असल्याचं स्पष्ट केलं. तसेच संजय पवार हे तळागाळातील शिवसैनिक आहेत. एका सामान्य शिवसैनिकाला राज्यसभेचं तिकीट मिळाल्याने कोल्हापुरातील शिवसैनिकांना बळ मिळालंय. आमच्यातल्या शिवसैनिकाला तिकीट दिल्याचा शिवसैनिकांना आनंद वाटत आहे, असं त्यांनी सांगितलं.
संपूर्ण महाराष्ट्रात दोन टप्प्यात आम्ही शिवसंपर्क मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपासून कोल्हापूर हॉट झालं आहे. मी रोज पत्रकारांशी सकाळी बोलतो. जिथे असेल तिथे पत्रकारांशी बोलतो. आज कोल्हापूरची वेळ आहे. माझा दौरा हा पूर्णपणे संघटनात्मक बांधणीसाठीचा आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी करणं, कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावा घेणं, कार्यकर्त्यांना पक्षप्रमुखांच्या सूचना पोहोचवणं यासाठीचा हा दौरा आहे. 2024 साठी आम्ही पूर्ण तयार आहोत. निवडणुका कोणत्या पद्धतीने लढायच्या हा पुढचा प्रश्न आहे. पण पक्ष कार्यकर्ते तयार राहिले पाहिजे यासाठी तयारी सुरू आहे. आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असं राऊत म्हणाले.
कोणता आसुरी आनंद मिळतो देव जाणे
उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये आस्था आणि आदर आहे. आपल्या घरातील माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला ही जनतेच्या मनात भावना आहे. विरोधी पक्ष केवळ विरोधासाठी विरोध करत आहे. महाविकास आघाडीने राज्याच्या हिताचा, जनतेच्या हिताचा निर्णय घेतला तरी त्यावर टीका केलीच पाहिजे हे विरोधकांनी ठरवलेलंच दिसतंय. शिवसेनेने वैयक्तिक राजकीय निर्णय घेतला तरी टीका होते. मन शुद्ध नसलेले लोक टीका करतात. कोणता आसूरी आनंद मिळतो माहीत नाही. पण त्यांना आनंद मिळत असावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
नवाब मलिकांचं अभिनंदन
यावेळी त्यांनी आर्यन खान प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचं अभिनंदन केलं. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने, दबावाखाली, प्रसिद्धीसाठी निरपराधांना अडकवतात. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. ईडी सीबीआय, न्यायव्यवस्था कोणीही असो कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रवादीने केलं की नाही माहीत नाही, पण मी नवाब मलिकांचं अभिनंदन करतो. हा सर्व खोटेपणा मलिकांनी समोर आणला. शेवटपर्यंत हे प्रकरण लावून धरलं. त्यांनी भाजपचा मुखवटा फाडला. त्यामुळे त्याची किंमत ते आज मोजत आहेत, असं राऊत म्हणाले. वानखेडेंवर कारवाईची मागणी आम्ही कशाला करावी. केंद्र सरकारला दिसत नाही का? एका तरुण मुलाला आत टाकलं जातं हे काय राजकारण आहे?, असा सवाल त्यांनी केला.