सो जा बच्चे, नहीं तो गब्बर आएगा… इतका डेंजर चेहरा देशात; संजय राऊत यांचा कुणावर हल्लाबोल?
मागच्या वेळी जरी अपघात झाला असला तरी चंद्रकांत खैरे हे मागची पाच वर्षे मनाने दिल्लीतच होते. त्यामुळे यावेळीही ते नक्कीच निवडून येणार आहे. अंबादास दानवे हे शिवसेनेचे अत्यंत निष्ठावंत कडवट शिवसैनिक आहेत. आम्ही सर्वच खैरे यांना विजयी करण्यासाठी कामाला लागलो आहोत. विजयाचा गुलाल आपणच उधळणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदींचा चेहरा भयंकर आहे. लोक घाबरायला लागले. सो जा बच्चे, नहीं तो गब्बर आएगा… इतका डेंजर चेहरा या देशात आहे. चेहरा नव्हे ही भूताटकी आहे. हे भूत आपल्याला उतरवायचे आहे. इतके भयंकर कांड या माणसाने देशात केलं आहे, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे संभाजीनगर लोकसभेची जागा लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी संजय राऊत संभाजी नगरात आले होते. यावेळी त्यांनी मोदींवर हा हल्ला चढवला. त्यांनी अब की बार 400 पारचा नारा दिलाय. 400 पार? लोकशाही काय तुमच्या बापाची आहे काय? मोदी 200 जागा जिंकले तरी खूप. इंडिया आघाडी 300 पार जाणार आहे, असं सांगतानाच मोदी परत पंतप्रधान होणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35 जागा हमखास जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.
हा डरपोकपणा आहे
शेख मुजीबर रेहमानवर भारतात वेब सीरिज दाखवली जाते का? त्यात इंदिरा गांधी यांची शौर्यगाथा आहे. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्या वेब सीरिजवर बंदी घातली आहे. हा डरपोकपणा आहे, अशी टीका त्यांनी केली.
मटण हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का?
तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे. मग तुम्ही गेल्या दहा वर्षात काय काम केलं ते सांगितलं पाहिजे. काय काम केलं हे सांगायचं सोडून विरोधक मटण खात असल्याचं ते म्हणतात. मटण कुणी कधी खायचं हा काय प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. देशाला एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान देशाला मिळाला आहे. ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर मोदींना गोल्ड मेडल मिळेल. फेकू चॅम्पियनशीप. एक टीम बनवू. स्टेट लेव्हलला देवेंद्र फडणवीस आणि नॅशनल लेव्हलला नरेंद्र मोदी असतील. उप कर्णधार म्हणून अमित शाह यांना ठेवावं लागेल, असा चिमटा त्यांनी काढला.
अवतारी पुरुष… मग नोकऱ्या का नाही?
अवतारी पुरुष आहे तर मग देशातल्या लाखो तरुणांना नोकऱ्या का देत नाही? गंगेत प्रेते वाहत होती तेव्हा अवतारी पुरुष थाळ्या वाजवायला सांगत होता. भाजप हा भाडोत्री लोकांचा पक्ष आहे. मला अटक केली. काय उखडलं? भगवा फडकवत गेलो. भगवा फडकवत आलो. हा देश हुकूमशाही समोर कधीच झुकला नाही. हुकूमशाहाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त 10 टक्के मतदान वाढवा. ईव्हीएम घोटाळा संपून जाईल. ईव्हीएम घोटाळा संपल्यावर मोदींचा पक्ष ग्रामपंचायतीलाही निवडून येणार नाही, असा दावाच त्यांनी केला.