Sanjay Raut: पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; राऊतांनी दानवेंना फटकारलं
Sanjay Raut: संजय राऊत यांनी यावेळी काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 370 कलमाचा विषय नाही. जम्मू-काश्मीर केंद्रशासित झाला म्हणून फरक पडला नाही. काश्मिरी पंडित रस्त्यावर उतरले आहेत.
मुंबई: बाबरी (babri masjid) पाडताना दुर्बिणीनं शोधूनही तिथे शिवसैनिक दिसला नाही, असं खोचक विधान भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी केलं होतं. दानवे यांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. दुर्बिणीने ते काय पाहतात ते पाहावं लागेल. त्यांच्याकडे दुर्बिण लावल्या म्हणूनच ते बाबरी पडत असताना पळून गेले आणि शिवसैनिकांनी बाबरी पाडली असं सत्यकथन भाजपच्या नेत्यांच्या तोंडून बाहेर पडलं. पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये, अशा शब्दात संजय राऊत (sanjay raut) यांनी दानवे यांना फटकारले आहे. दरम्यान, राऊत यांनी जीएसटीच्या परताव्याबाबत बोलण्यास नकार दिला. याबाबत राज्याचे अर्थमंत्री अधिकारवाणीने सांगू शकतील. पण केंद्र सरकारने राज्याची देणी दिली पाहिजे. ते पैसे थांबवून ठेवता कामा नये, असं ते म्हणाले. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
संजय राऊत यांनी यावेळी काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 370 कलमाचा विषय नाही. जम्मू-काश्मीर केंद्रशासित झाला म्हणून फरक पडला नाही. काश्मिरी पंडित रस्त्यावर उतरले आहेत. सामुदायिक स्थलांतर करण्याबाबत काश्मिरी पंडितांनी केंद्राला सूचना दिली आहे. केंद्रातील सरकार प्रखर हिंदुत्ववादी आहे. राष्ट्रवादी आहे. घरवापसी बाबत आग्रही असणारे सरकार आहे. नोटबंदी नंतर काश्मीरमधील दहशतवाद खतम होईल असं आश्वासन देणारं सरकार आहे. काश्मीरमध्ये जवान, काश्मिरी पंडित आणि अनेक मुस्लिम पोलीस मारले जात आहेत हे महत्त्वाचं आहे. या देशाची जे पोलीस सेवा करत आहेत, त्यांचं रक्षण केंद्र सरकार करू शकत नाही. सरकार पूर्णपणे फक्त निवडणुका आणि राजकारण यात गुंतून पडलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेकडे सरकारचं लक्ष नाही. काश्मीरमध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. पण या सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही हे दुर्देव आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
हार्दिक व्यवस्थेचे बळी
हार्दिक पटेल आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यावरूनही त्यांनी पटेल यांना चिमटा काढला. हार्दिक पटेल यांनी स्वत:च्या भूमिका तपासून पाहाव्यात. देशद्रोही असं त्यांना भाजपनं म्हटलं होतं. त्यांच्याबाबत भाजपने देशद्रोहीची व्याख्या केली होती. ते काय होतं. अनेक मासे त्यांच्या गळाला लागत असतात. खोट्या केसेस दाखल करून सत्येचा गैरवापर केला जात आहे. हार्दिक पटेल त्या व्यवस्थेचे बळी आहेत, असं ते म्हणाले.
दरम्यान, आज सकाळी 11 वाजता हार्दिक पटेल हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. 18 मे रोजी हार्दिक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांच्या प्रवेशाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्याबाबतचं ट्विटही त्यांनी केलं आहे.