Shivsena NCP: आस्ते कदम भूमिका घ्याल तर स्वत:साठी फाशीचा दोर वळलाच म्हणून समजा; राऊतांच्या गृहखात्याला कानपिचक्या
भाजप (BJP)नेत्यांविरोधातील पुरावे देऊनही गृहखात्याकडून काहीच कारवाई होत नसल्याने शिवसेनेत (shivsena) धुसफूस वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप गृहखात्याला कानपिचक्या दिल्या आहेत.
मुंबई: भाजप (BJP)नेत्यांविरोधातील पुरावे देऊनही गृहखात्याकडून काहीच कारवाई होत नसल्याने शिवसेनेत (shivsena) धुसफूस वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप गृहखात्याला कानपिचक्या दिल्या आहेत. गृहखात्याने अधिक सक्षम झालं पाहिजे. काल या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याशी चर्चा झाली आहे. तपास यंत्रणा राज्यात येऊन कारवाया करत आहेत हे गृहखात्यावर आक्रमण आहे. या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. आता गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल. नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत भाजप नेत्यांवरील कारवायांवरून धुसफूस असल्याचं सांगितलं जात आहे.
संजय राऊत यांनी यावेळी केंद्र सरकारवरही टीका केली आहे. या देशातील जनतेला राज्यकर्ते नेहमीच एप्रिल फूल करत असतात. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. सरकारने एप्रिल फूल करून टाकलं, पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले. जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबत वर्षानुवर्ष एप्रिल फूल सुरू आहे. आता एप्रिल फूल हा गंमतीचा विषय राहिला नाही, एप्रिल फूल हा जगण्या मरण्याचा प्रश्न जनता आणि सरकारमध्ये झाला आहे. त्यातून मार्ग काढावा लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देशात सत्ताधाऱ्यांकडून एप्रिल फूलची मालिका
प्रत्येक सरकारने जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे आणि थापा मारणं बंद केलं पाहिजे. फसवाफसवी बंद केली पाहिजे. लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न फार गंभीर होत चालले आहेत. गंमत तेवढ्या पुरती ठिक असते. आता अच्छे दिन येणार हे सुद्धा एप्रिल फूलच आहे. तुमच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. लोक वाट बघत आहेत. सात वर्ष एप्रिल फूलच सुरू आहे. 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार हे एप्रिल फूलच आहे. पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात येणार हे सुद्धा एप्रिल फूलच आहे. महाराष्ट्रात किंवा देशात सूडाचं राजकारण करत नाही हे सांगणं हे एप्रिल फूलच आहे. अशी अनेक एप्रिल फूलची मालिका गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. तरीही महाराष्ट्र पुढे चालला आहे, असं ते म्हणाले.
आघाडीत धुसफूस नाही
दरम्यान, आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. मीडिया कधी काय बातम्या चालवेल याचा नेम नाही. राज्यातील कोणताही मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. अशा भेटी म्हणजे धुसफूस आहे असं समजण्याचं कारण नाही. त्या त्या खात्याशी संदर्भात किंवा राज्याशी संदर्भात काही गोष्टी असतात, त्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागते, असं थोरात यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : 6 एप्रिलला धोपेश्वर येथे ग्रामसभेचं आयोजन; रिफायनरीबाबत होणार ठराव