पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव; डिग्रीचा ‘हा’ फोटो, संसदभवनात मेनगेटवर लावा, संजय राऊतांचं ट्विट चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा मुद्दा विरोधकांनी चांगलाच उचलून धरलाय. आता संजय राऊत यांनीदेखील मोदींना ट्विटच्या माध्यमातून टार्गेट केलंय.
मुंबई : गुजरात हायकोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendta Modi) यांची डिग्री सार्वजनिक करण्याचा आदेश रद्द ठरवल्यानंतर आता विरोधकांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आहे. देशाच्या पंतप्रधानांना आपली डिग्री दाखवण्याची लाज का वाटावी, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येतोय. काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संभाजीनगर येथील सभेत हाच मुद्दा उचलून धरला तर आज संजय राऊत यांनीदेखील पंतप्रधानांना डिवचणारे ट्विट केले आहे. राऊत यांनी ट्विटमध्ये एका डिग्रीचा फोटो शेअर केलाय. ही डिग्री संसदभवनाच्या मेनगेटवर टांगा, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय.
नेमकं ट्विट काय ?
हमारे प्रधानमंत्री मोदीजी की ये जो डिग्री है,लोग कहते हैं कि यह बोगस है, लेकिन मैं मानता हूं कि ‘Entire Political Science’ शोध विषय पर ये ऐतिहासिक व क्रांतिकारी डिग्री है.इसे नए संसद भवन के मुख्यद्वार पर फ्रेम करके लटकाना चाहिए.ताकि लोग प्रधानमंत्री जी की योग्यता पर सवाल न उठाएं. pic.twitter.com/d5dnL4nZvk
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 3, 2023
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका डिग्रीचा फोटो ट्विट केलाय. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव असून एंटायर पॉलिटिकल सायन्स असं विषयाचं नाव लिहिलंय. डिग्रीचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. यावरून राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, ‘ आपल्या पंतप्रधान मोदी यांची ही डिग्री बोगस असल्याचं लोक म्हणतायत. पण मी म्हणतो- ‘Entire Political Science’ या विषयावरील ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी डिग्री आहे. नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर ही फ्रेम करून लटकवली पाहिजे. यामुळे पंतप्रधानांच्या डिग्रीवरून लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत…..
गुजरात कोर्टाचा निर्णय काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री नेमकी काय आहे, ती सार्वजनिक करा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाकडे माहिती अधिकाराखाली केली होती. सात वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे. तत्कालीन निवडणूक आयोगाने दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला ही डिग्री सार्वजनिक करण्यासंबंधीचे आदेशही दिले होते. मात्र गुजरात हायकोर्टाने नुकताच यासंबंधी निर्णय दिला असून तत्कालीन निवडणूक आयुक्तांनी दिलेला आदेश रद्द ठरवला. तर मोदींची डिग्री मागणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. मात्र आम आदमी पार्टीसह देशभरातील विरोधकांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.