50 खोके, राष्ट्रवादी ओके, आता शरद पवारांसाठी घोषणा द्या, शिंदे गटाच्या आमदाराची मागणी
आम्ही तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी हा प्रयत्न केलाय. मात्र त्यांनी आमच्यावर खोक्यांचे आरोप केले, असं स्पष्टीकरण शिंदे गटाच्या आमदाराने दिलंय.
मुंबई : आमच्यासाठी महाराष्ट्रात 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या जात आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही नागालँडमध्ये तेच केलंय. त्यामुळे त्यांच्या नावानेही आता अशा घोषणा द्या. नागालँडमध्येही ते पैसे वाटणार असल्याची माहिती आहे, असं वक्तव्य शिंदे गटाच्या आमदाराने केलंय. आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत हे वक्तव्य केलंय. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आघाडीला पाठिंबा दिला आहे. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या या युतीवरून महाराष्ट्रातही जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
शरद पवार बोलतात एक आणि करतात एक. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्यांसोबत आघाडीच्या घोषणा प्रत्यक्षात आणण्याचं काम शरद पवार यांनी केलंय. आता नागालँडमध्ये त्यांनी ५० खोके एकदम ओके ही घोषणा द्यावी. जे आमच्यावर आरोप करत होते, त्यांनी ते नागालँडमध्ये प्रत्यक्ष केलंय. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे पाहून ती घोषणा द्यावी. यासाठीचं वाटपही लवकरच करण्यात येणार, अशी माझी माहिती आहे. अजितदादांच्या शपथविधीतही शरद पवार यांचा हात होता. त्यामुळे येणाऱ्या काळात राजकारण बदलायला वेळ लागणार नाही, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय.
आम्ही तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी हा प्रयत्न केलाय. मात्र त्यांनी आमच्यावर खोक्यांचे आरोप केले. आता नागालँडमध्ये पन्नास खोके, राष्ट्रवादी ओके हा नारा घुमणार, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय.
नागालँडमध्ये काय घडलं?
ईशान्य भारतातील नागालँड, मेघालय, त्रिपुरात विधानसभा निवडणुका पार पडल्या. नागालँडमध्ये ६० विधानसभा सदस्यांपैकी २५ जाहा एनडीपीपीने जिंकल्या. त्यानंतर भाजपने १२, रिपब्लिकन पक्षाने दोन, राष्ट्रवादी काँग्रेसने ७ आणि नॅशनल पिपल्स पार्टीने ५ जागा जिंकल्या. तर ४ अपक्ष निवडून आले. या राज्यात भाजप आणि एनडीपीपीने युती केली आहे. तर राज्यात सर्वपक्षीय सरकार स्थापन झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेडीयूनेही भाजप आघाडीला पाठिंबा दिला आहे.