वेडाय म्हणून भुंकतोय, म्हणून आम्ही पाहत होतो. पण आज…संजय शिरसाठ यांची संजय राऊत यांच्यावर जहरी टीका…
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केले असून त्यावरून त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाईची मागणी केली जात असून आमदार संजय शिरसाठ यांनी जहरी टीका केली आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हणत एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर हल्लाबोल केला होता. आणि याच वादग्रस्त विधानामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई देखील होईल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात आहे. आणि तशा स्वरूपाची मागणी देखील आज विधिमंडळात करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून विधानसभा आणि विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करावा अशी मागणी करत त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावरून सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाचे अर्थात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ ( Sanjay Shirsath ) यांनी मात्र यावेळी जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत वेडा आहे म्हणून तो सकाळी भुंकतोय म्हणून आम्ही पाहत होतो पण आज त्याने हाईट केली अशी जहरी टीका शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केली असून संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांनी संपूर्ण 288 आमदारांचा अपमान केला आहे, त्याच्यावर हक्कभंगाची कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही सभागृहात केली आहे असं म्हणत संजय शिरसाठ यांनी विधिमंडळाचा चोरमंडळ म्हणून अपमान केला आहे.
सभागृहात संजय राऊत यांच्या वक्तव्याचे कोणीही समर्थन केलेले नाही. त्यामुळे संजय राऊत चोर म्हणत असताना ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, आणि छगन भुजबळ या सर्वांना चोर म्हणाले आहे.
त्यामुळे एकट्या संजय राऊत ने 288 आमदारांचा अपमान केला आहे, विधिमंडळाचा अपमान केला आहे, बारा कोटी जनतेला संजय राऊत चोर म्हणत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे.
संजय राऊत यांच्या भावाने आतमध्ये समर्थन केलं नाही पण बाहेर येऊन समर्थन केले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्याप्रमाणे सुनील राऊत हे देखील चोर आहे म्हणत संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
कोल्हापूर येथे संजय राऊत यांनी विधीमंडळ चोरमंडळ असल्याची टीका केली होती. त्यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर टीका केली आहे. त्याच संजय शिरसाठ यांनी आता त्यांचा पळण्याचा टाइम आला आहे म्हणत संजय राऊत यांच्या अटकेबाबत सूचक व्यक्तव्य केले आहे.