सांगली | 9 डिसेंबर 2023 : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक धरणातील पाणीसाठी कमी झाला आहे. त्यातच आता पश्चिम महाराष्ट्रात कोयना धरणाच्या पाण्यावर वातावरण तप्त झाले आहे. सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडले जाते. परंतू आता कोयनेच्या पाण्यावरुन वाद सुरु झाला आहे. कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात येणारे पाणी येत्या सोमवार दिनांक 11 डिसेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. यावरुन जर सांगली जिल्हयासाठीचे पाणी बंद केल्यास शेतकऱ्यांसह कोयनेवर जाऊन धरणाचे दरवाजे तोडू असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे नेते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी दिला आहे.
कोयनेतील पाणीसाठा आजवर अनेकदा कमी झाला आहे. परंतू, यापूर्वीच्या साताऱ्याच्या कोणत्याही पालकमंत्र्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतलेली नाही. परंतु, आताचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा का केला आहे ? सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात येणारे पाणी सोमवारपासून बंद केल्यास हजारो शेतकऱ्यांसह कोयनेवर जाऊन धरणाचे दरवाजे तोडू, असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सरकारला दिला आहे.तर यावेळी एकाच सरकारमध्ये असलेले पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार संजय पाटील आणि आमदार अनिल बाबर यांची मिलीभगत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी केला आहे.
कोयना धरणातून सांगलीसाठी सोडण्यात येणारे पाणी सोमवार, दि. 11 डिसेंबरपासून बंद होणार आहे. असल्याच्या पार्श्वभूमीवर संजय विभूते आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ॲड. मुळीक यांनी आपली भूमिका मांडली आहे. सरकारवर नाराज असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी कोयना धरणातील पाण्याचा प्रश्न विनाकारण निर्माण केला जात आहे. वास्तविक कोयनेतील पाण्यावर सातारा जिल्ह्यातील जलसिंचन योजना अवलंबून नाहीत. मंत्री शंभुराज देसाई यांना सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एवढा पुळका असेल तर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या जिल्ह्यातील जलसिंचन योजना पूर्ण कराव्यात असे संजय विभूते यांनी म्हटले आहे. कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी बंद केल्यास शेतकरी स्वत: हातात कुदळ, पाटी, खोरे, टिकाव घेऊन कोयना धरणाचे दरवाजे तोडतील असा इशारा त्यांनी दिला आहे.