धनंजय मुंडे नक्की कुठे? अजित पवार, पंकजा मुंडेंनी केला मोठा गौप्यस्फोट
बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी समोर आलेल्या 8 फोटोंनी आणि व्हिडीओनी खळबळ उडाली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांची अनुपस्थिती आणि आरोग्य स्थिती यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विविध खुलासे होत आहेत. संतोष देशमुखाच्या निर्घृण हत्या करतानाचे ८ फोटो आणि काही व्हिडीओही समोर आले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे हे महाराष्ट्र सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभाग सांभाळत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या कित्येक दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला किंवा बैठकीला दिसलेले नाहीत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता धनंजय मुंडे नेमके कुठे आहेत याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी काल बैठक पार पडली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते, आमदार, मंत्री देवगिरीवर उपस्थित होते. या बैठकीत पक्षीय कामकाज व इतर महत्वाच्या बाबींचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित नव्हते. तसेच आज अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. या बीड दौऱ्यावेळीही धनंजय मुंडे हजर नव्हते. यानंतर धनंजय मुंडे कुठे आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. आता अजित पवार यांनी धनंजय मुंडे नेमके कुठे आहेत, याबद्दल सांगितले आहे.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार यांनी बीड दौऱ्यात जोरदार भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले. “अल्पसंख्यांक भागातील विकास करणे हे महत्वाचे आहे. मी आज याबाबत बैठक घेणार आहे. मी कामाचा माणूस आहे. फालतू गप्पा मारायला, टाईमपास करायला मला आवडत नाही. मध्यंतरी काही घटना घडल्या, त्यातून बीडची बदनामी झाली. अशा घटना परत घडू देऊ नका. वेळ पडला तर त्याच्यावर माकोका किंवा इतर कारवाई केली जाईल”, असे अजित पवार म्हणाले.
“धार्मिकस्थळावर काही समाजकंटकांनी जिलेटिनच्या कांड्या टाकल्याची घटना घडली. अशा लोकांना आम्ही सोडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वधर्म समभाव ही विचारधारा घेऊन पुढे जात आहोत. चुकीचं काम करणारा कितीही मोठया बापाचा असला तरी त्याला सोडणार नाही. आमचं पोलीस खाते गप्प बसणार नाही. आज धनंजय मुंडे गैरहजर आहेत. त्यांनी मला कॉल करून सांगितले की माझी तब्येत बरी नाही. मी दवाखान्यात दाखल होतो आहे. त्यामुळे येत नाही”, असेही अजित पवारांनी म्हटले.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितिबद्दलही भाष्य केले. “आता मला बीड जिल्ह्यात पळायचं आहे. माझ्या जिल्ह्यात कार्यक्रमाला उशीर झाला आहे. दुसऱ्यांचे काय चालले हे मला काय माहिती? कोणाचे काय चालले आहे, हे मला काय माहिती, त्यांची तब्येत बरीच दिवस झालं बरी नाही”, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.