मोठा खुलासा, अखेर तो धागा सापडलाच, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड, विष्णु चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात संभाषण
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात एसआयटीने मोठा खुलासा केला. त्यानुसार या सर्व प्रकरणात वाल्मिक कराड याचा स्पष्ट हात असल्याचे म्हटले आहे. संघटित गुन्हेगारीचे प्रकरण असल्यानेच कराडवर मोक्का लावल्याचे एसआयटीने न्यायालयात स्पष्ट केले आहे. या खुलाशामुळे कराडचा पाय खोलात आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या दिवशीच सध्या मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींमध्ये संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. तपास अधिकाऱ्यांनीच ही माहिती आज केज कोर्टात दिली. सध्या याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. या तिघांमध्ये दहा मिनिटे संभाषण झाले. संतोष देशमुख यांचे अपहरण आणि या तिघांमधील संभाषण याची वेळ जुळत असल्याचे दिसून येत आहे. आता हा मोठा धागा पोलीस यंत्रणेच्या हाती आला आहे.
दहा मिनिटे संभाषण
संतोष देशमुख यांचे अगोदर अपहरण करण्यात आले. त्यानंतर कारमध्ये त्यांना मारहाण करण्यात आली. संतोष देशमुखांची हत्या झाली तेंव्हा ३ वाजून २० मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटे या काळात म्हणजे १० मिनिटे वाल्मिक कराड, विष्णु चाटे आणि सुदर्शन घुले मध्ये संभाषण झाले. त्यामुळे पोलिसांचा तपास आता रुळावर आल्याचे बोलले जात आहे. आता या संभाषणात काय होते, या तिघांमध्ये काय बोलणे झाले याची चौकशी करण्यात येत आहे. या तीनही आरोपींमध्ये दहा मिनिटांमध्ये काय चर्चा झाली हे तपासात समोर येईल. त्यामुळे वाल्मिक कराडचा या संपूर्ण खून प्रकरणात संबंध आहे का, त्याचा थेट सहभाग आहे का, हे तपासानंतर समोर येणार आहे.
वाल्मिक कराडची संतोष देशमुख यांना धमकी
वाल्मिक कराड याने हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांना धमकी दिल्याचे एसआयटीने न्यायालयात सांगितले. एसआयटीने वाल्मिक कराड याच्यावर मोक्का का लावण्यात आला यासंबंधीची बाजू मांडली. हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना धमकावल्याचा दावा एसआयटीने केला. त्यासाठी ९ मुद्दे एसआयटीने मांडले आहेत.
वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची विनंती
केज न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एफआयआरमध्ये संतोष देशमुख यांच्या अपहरणातील वेळ आणि आता या तीन आरोपींमधील संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे वाल्मिकचा पाय आता अधिक खोलात गेला आहे. वाल्मिक कराड याच्या दहा दिवसांच्या कोठडीची विनंती एसआयटीने केली आहे.