मोठी बातमी! धनंजय मुंडे राजीनामा देणार? अजितदादांच्या भेटीसाठी पोहोचले, घडामोडींना वेग
आज सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, त्यानंतर घडामोडींना वेग आला असून, धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. या प्रकरणात आज सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राज्यपालांकडे सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणात दबाव वाढत आहे.
दरम्यान मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. धनंजय मुंडे हे अजितदादांच्या मंत्रालयातील दालनात त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या 15 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. अजित पवार आता या प्रकरणात नेमका काय निर्णय घेणार? दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा सुरू आहे? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
दरम्यान आज सर्वपक्षीय नेत्यांकडून आज राज्यपालांची भेट घेण्यात आली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. या प्रकरणात आपण लक्ष घालू असं आश्वासन देखील यावर राज्यपालांकडून देण्यात आलं आहे. आता उद्या सर्वजण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहोत अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
सुरेश धस यांची आक्रमक भूमिका
भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. एवढंच नाही तर अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी घालत आहेत, असा आरोपही यावेळी सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.