जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले ‘परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा, अन् धनंजय मुंडेंना…’
आज वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली, यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.
मोठी बातमी समोर येत आहे, अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराडपूर्वी आठ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र वाल्मिक कराड याच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी देशमुख कुटुंबाकडून सुरू होती. अखेर आज वाल्मिक कराड याच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले आव्हाड?
वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, यावर प्रतिक्रिया देताना 307 देखील दाखल करा अशी मागणी यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. पुढे बोलताना त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंना देखील टोला लगावला आहे. परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा आणि धनंजय मुंडेंना तेथील पंतप्रधान घोषित करा. धनंजय मुंडेंचा राजीनामा क्रमप्राप्त होता. असा टोलाही यावेळी आव्हाड यांनी लगावला आहे. दरम्यान अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल का घेतली नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला. परळीत अजूनही अनेक पोलीस अधिकारी वाल्मीक कराड यानेच नेमलेले आहेत, असा आरोपीही यावेळी आव्हाड यांनी केला आहे.
वातावरण तापलं
वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर परळीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. परळीमध्ये आज सकाळपासूनच वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात वाल्मिक कराड याची आई देखील सहभागी झाली होती. मात्र आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावली, पाण्याच्या टाकीवर चढून समर्थकांनी आंदोलन केलं.
त्यानंतर वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आल्याची बातमी समोर येताच समर्थक आधिक आक्रमक झाले. बेमुदत परळी बंदची हाक देण्यात आली आहे, टायर जाळून निषेध करण्यात आला. तसेच आंदोलकांकडून बसवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे, आता उद्या वाल्मिक कराड याला केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.