‘लेकराचं कुंकू पुसलं, मुलांकडे पाहावत नाही, हात जोडून सांगतो…; बीडच्या आक्रोश मोर्चात जरांगे पाटील भावुक
संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज बीडमध्ये आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 19 दिवस झाले आहेत, मात्र अजूनही या प्रकरणातील काही आरोपींना अजूनही अटक झालेली नाहीये. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. आज बीडमध्ये देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बोलताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
लेकराला आता बाप दिसणार नाही. तिच्या पाठीवर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला. तुमचे आमचे भाषण होत राहातील. या कुटुंबाच्या पाठी राहावं लागेल. प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा. आपला जिल्हा सोडायचा नाही. मागे हटू नका. ते आणखी हल्ले करतील. आता वाट पाहायची नाही. आता जशाला तसं उत्तर द्यायचं. बघू किती दिवसांमध्ये आरोपींना अटक होते. अरे आपण मराठे आहोत मराठे. पाणीच पाजायचं त्यांना. आपण जे बोलतो तेच करतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, हात जोडून सांगतो. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा. त्यांना सांगा ज्या ज्या लोकांची नावं या प्रकरणात आली आहेत, त्यांना अटक करा. मी या लेकराचं तोंड पाहू शकत नाही. तुमचा नेता आमचा नेता नाही. आमचा दुश्मन नाही. विरोधी पक्ष आमचा सासरा नाही. पण या लेकराचं कुंकू पुसलं गेलंय.
पुढच्या काळात सावध राहा. आरोपी सापडणं काही मोठी गोष्ट नाही. आमची लय फजिती केली गेली. आमचं एक पोरगं मुंबईत आठ महिने होतं. एक कमेंट टाकली होती. अन् तुम्हाला खून केलेला आरोपी सापडत नाही. १५४ च्या नोटीशीतील पोरंही आत गेले. तुम्हाला खूनाचा आरोपी सापडत नाही. सरकार आलंय. सरकार गोरगरीबांना न्याय देणार की नाही. उरण, परभणी, धाराशीव, अंबड, अनेक ठिकाणी गुन्हे घडत आहे. पण आरोपी मोकाट आहेत, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.