संतोष देशमुख हत्याप्रकरणात मनोज जरांगेंना वेगळीच शंका, थेट मुख्यमंत्र्यांचं नाव घेत म्हणाले…
वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्याच्या मागणीसाठी आज मस्साजोगमध्ये ग्रामस्थांनी आंदोलन केलं, यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्याकांडानं राज्यभरात खळबळ उडाली. या घटनेला आता एक महिना उलटून गेला आहे. या प्रकरणातील आठ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर देखील आरोप झाले होते. तो सध्या सीआयडी कोठडीत आहे. मात्र त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे आता मस्सोजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थानी पण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. या आंदोलनात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील सहभागी झाले होते. जर कराडवर मोक्का लावला नाही तर मी पाण्याच्या टाकीवरून उडी मारणार असा इशारा त्यांनी दिला होता.
दरम्यान त्यानंतर आंदोलनस्थळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील पोहोचले, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे, मुख्यमंत्री आरोपी वाचवायला लागले आहेत, अशी आता शंका येते. खंडणीतला आरोपी आहे तो , तुमचं सरकार चालवतो का? असं समजायचं का? असा सवाल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला अजून चाटेचा मोबाईल सापडत नाही, त्यामध्ये खूप पुरावे असतील म्हणून तर तो मोबाईल फेकून दिला. देशमुख कुटुंबीयांना धक्का लागला तर आम्हाला सुद्धा मराठे म्हणतात. देशमुख कुटुंबातील एकाही माणसाच्या जीवाला काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगणं मुश्किल होईल. जर मुख्यमंत्र्यांनी राज्य विद्रूप करायच ठरवलं असेल तर आमचाही नाविलाज आहे. आम्ही धनंजय मुंडेंच्या टोळीची मजा मस्ती उतरवणार, फडणवीस साहेबांना विनंती आहे यांना मोक्का लावा. या प्रकरणात शेकडो नाही तर हजारो पुरावे आहेत, एवढे पुरावे असून तुम्ही यांना 302 मध्ये नाही टाकलं. मुख्यमंत्री साहेब तुम्ही त्यांना सांभाळत आहात, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.