संतोष देशमुख यांच्या हत्येचं 3333 कनेक्शन, आरोपी सुदर्शन घुलेबाबत खळबळजनक माहिती समोर
सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणातील आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली होती. आता हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे, मात्र एक जण अद्यापही फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आता राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबतच सामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांमध्येच पोलिसांनी या प्रकरणातील चार आरोपी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले व विष्णू चाटे यांना अटक केली. मात्र या प्रकरणातील तीन आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार होते, घटनेला 22 दिवस उलटले तरी देखील ते पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागत नव्हते. दबाव वाढत होता, अखेर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आलं आहे. तर याच दिवशी त्यांना मदत करणाऱ्या आणखी एकाला मुंबईतून अटक करण्यात आलं. मात्र अजूनही या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्याचा शोध शुरू आहे.
या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर देखील आरोप करण्यात येत होता. पुण्यातून या आरोपींना अटक करण्यापूर्वीच तो सीआयडीला शरण आला. दरम्यान या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना कोर्टानं 18 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावली आहे.
3333 कनेक्शन अन् सुदर्शन घुले
समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे सुदर्शन घुलेची आधीपासूनच त्याच्या गावासह तालुक्यात दहशत होती. तो 3333 हा नंबर लकी मानायचा, सुधीर सांगळे याच्यासह त्याची जी गँग होती तीचं नाव देखील 3333 च होतं. एवढंच नाही तर घुलेने संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी जी गाडी वापरली होती, त्याच्या त्या गाडीचा नंबर देखील 3333 च होता.