मोठी बातमी! सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला 14 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
संतोष देशमुक हत्याप्रकरणात पुण्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं, न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती, तर त्यांना मदत करणाऱ्या आणखी एका आरोपीला देखील अटक करण्यात आली. दरम्यान या आरोपींना पोलिसांकडून केज न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टानं या घटनेतील तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोर्टात युक्तिवाद करताना डीवायएसपी अनिल गुजर यांनी म्हटलं की, सुदर्शन घुले याने हत्येआधी अवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन दमदाटी केली होती. त्यानंतर त्याला मारहाण झाली होती. संतोष देशमुख आणि मस्साजोग मधील लोकांनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांना रस्त्यात अडवून एके दिवशी आरोपींनी जबरदस्त मारहाण केली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
कोर्टात नेमकं काय घडलं?
आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी यावेळी सीआयडीच्या एसआयटी टीमकडून कोर्टात करण्यात आली. हे टोळीने गुन्हे करणारे आरोपी आहेत. संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणे जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणे हा यांचा पेशा आहे. या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही. संतोष देशमुख यांचा खून यांनी एंजॉय केला आहे. या आरोपीना आता आळा घालणे गरजेचे आहे, त्यामुळे तपासासाठी आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तीवाद कोर्टात करण्यात आला.
तर दुसरीकडे आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे असलेलेले मुद्दे पुरेसे नाहीत. जवळपास या गुन्ह्यातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. विष्णू चाटे यालाही आधीपासूनच अटक करण्यात आलेली आहे. डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झाले असे पोलीस म्हणत आहेत. आरोपींना केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही असे म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद यावेळी आरोपींच्या वकिलांनी केला. दरम्यान न्यायालयानं दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडली सुनावली आहे.