Santosh Deshmukh murder case : आकाच्या आकाचे नाव पहिल्यांदाच समोर, सुरेश धस यांचा मोठा दावा
आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आतापर्यंत अनेक गौप्यस्पोट केले आहेत. आज देखील त्यांनी मोठा दावा केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून, त्यांची हत्या करण्यात आली. हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्याकडून या प्रकरणात सातत्यानं आकाचा उल्लेख करण्यात येत आहे. त्यामुळे हे आका नेमके कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता. सुरेश धस यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे. त्यांनी आकाच नाही तर आकाच्या आकाचं नाव देखील आता थेट सांगितलं आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
विष्णू चाटे हाच आका असल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केज न्यायालयात केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना सुरेश धस यांनी म्हटलं की, विष्णू चाटे हे एक प्यादं आहे. आका म्हणजे वाल्मिक कराड असून, आकाचे आका म्हणजे वाल्मिक कराडचे आका हे धनंजय मुंडे असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. मी पाच टर्म आमदार आहे, पण माझं बँकेत एकच खात आहे. मात्र वाल्मिक कराड यांचे बँकेत 100 खाते आहेत, 17 मोबाईल वापरतो असा आरोपही यावेळी सुरेश धस यांनी केला आहे.
सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
दरम्यान आज सर्वपक्षीय नेत्यांकडून या प्रकरणात राज्यपालांची भेट घेण्यात आली आहे. सर्व पक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन देखील राज्यपालांकडून देण्यात आलं आहे. तसेच उद्या आम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेणार आहोत अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
सुरेश धस यांचा अजित पवारांवरही आरोप
दरम्यान संतोष देशमुख हत्याप्रकरणात बोलताना सुरेश धस यांनी अजित पवारांवर देखील आरोप केले आहेत. अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी घातल आहेत. अजित पवार हे धनंजय मुंडे यांना का पाठिशी घालत आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.