Sanjay Raut : संतोष देशमुख मर्डर खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा; संजय राऊत यांची सर्वात मोठी मागणी
या प्रकरणात खरा तपास होईल का? , खरोखर न्याय मिळेल का? अशी शंका लोकांच्या मनात आहे. हा खटला बीडमध्ये चालू नये, तो बाहेर चालवावा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संतोष देशमुखांच्या खुनाने अनेक गुन्ह्यांना वाचा फुटली आहे. सत्ता आल्यापासून आम्ही बीडचे आका, सध्याचे मुख्यमंत्री , दोन उपमुख्यमंत्री यांचे फोटो, त्यांचा एकमेकांसोबत असलेला वावर , संवाद याचे अनेक फोटो आम्ही पाहिले. त्यामुळे या प्रकरणात खरा तपास होईल का? , खरोखर न्याय मिळेल का? अशी शंका लोकांच्या मनात आहे. हा खटला बीडमध्ये चालू नये, तो बाहेर चालवावा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. याप्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असे देवेंद्र फडणवीस नुसतं बोलत आहे, पण आत्तापर्यंत त्यांनी किती जणांना कसं सोडलंय, आणि कसं अडकवलंय याचीच एक SIT नेमली पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
त्यांनी किती जणांचा आक्रोश दाबलाय…
गेल्या काही काळात मा. देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना सोडलंय, किती जणांच्या रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलं आहे, किती जणांचे आक्रोश आणि किंकाळ्या दाबल्या आणि किती जणांना अडकवलयं यासंदर्भात एक एसआयटी त्यांनी स्वत: स्थापन केली आणि त्यांनीच रिपोर्ट घेतला पाहिजे, असे आरोप करत राऊतांनी टीकास्त्र सोडलं. बीडच्या प्रकरणात ते फार गंभीर आहेत असं दिसतंय. एक वाल्मिक कराडला अटक केली आहे. पण बीडमध्ये हा खटला चालू नये अशी माझी मागणी आहे. अशा अनेक केसेस असतात, ज्या त्या राज्याच्या बाहेर चालवल्या जातात. बीडमधील हत्या हा इतका गंभीर विषय आहे, हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे या मागणीचा पुनरुच्चार राऊत यांनी केला.
आता बीड क्लिंटन आला आहे
पण सरकार त्यांचं आहे, गृहमंत्री त्यांचा आहे, त्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला, तरीही न्याय मिळण्याची शक्यता नाही. पण हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने सध्या मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असं राऊत म्हणाले. आत्तापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहित होते, आता बीड क्लिंटन आलेलं आहे, त्याच पद्धतीने, असा टोला राऊतांनी हाणला. देवेंद्र फडणवीस यांना हे सगळं माहीत आहे, त्यांनी या राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारीने काम करतोय हे दाखवून देण्यासाठी त्यांनी सत्य – न्यायाची बाजू घेतली पाहिजे.
गुन्हेगार, आरोपी कितीही मोठा असो, त्यांचा मित्र असो किंवा मंत्रीमंडळात असला तरी या गोष्टींचा विचार न करता त्यांनी ( बीडच्या हत्याप्रकरणी) न्याय दिला पाहिजे, अशी मागणीही राऊतांनी केली.