सातारा जिल्ह्यातून कृष्णा, कोयना, वेण्णा, उरमोडी, येरळा अशा प्रमुख नद्या वाहतात. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारं कोयना धरण देखील पाटण तालुक्यात आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कास पुष्प पठार, ठोसेघर, भांबवली धबबधा, लिंब येथील बारा मोटेची विहीर आणि औंध येथील संग्रहालय ही पर्यटनस्थळं जिल्ह्यात आहेत. छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांचं काही काळ साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर वास्तव्य होतं. छत्रपती संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहू यांच्या काळात राज्याच्या राजधानीचा मान सातारा शहरास मिळाला. महात्मा जोतिबा फुले यांचं मूळगाव सातारा जिल्ह्यातील कटगूण हे असून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव नायगाव हे देखील जिल्ह्यात येतं. सत्यशोधक चळवळीचा बालेकिल्ला म्हणून साताऱ्याची ओळखी होती. 1857 चा उठाव ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्त्वातील प्रतिसरकार स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1900 ते 1904 दरम्यान सातारा शहरातील सातारा हायस्कूलमध्ये (सध्याचं प्रतापसिंह हायस्कूल) शिक्षण घेतलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यातचं रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. राज्याचं पहिलं मुख्यमंत्री साताऱ्याचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी भूषवलं. सातारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ 10480 स्के. कि.मी. असून लोकसंख्या 2011 च्या जनगनणेनुसार 30 लाख 03 हजार 741 इतकी आहे. जिल्ह्यात 7 उपविभागीय कार्यालयं असून 11 तालुके आहेत. सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, दहीवडी, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर हे तालुके असून जिल्ह्यात 1719 गावं आहेत. जिल्ह्यात सातारा आणि माढा असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. माढा मतदारसंघ सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये येतो. सातारा-जावळी, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण,पाटण, वाई-महाबळेश्वर, फलटण, माण असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात 11 पंचायत समित्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा