महापुरुषांचा अवमानही देशद्रोहच ठरवा, कायद्यात तरतूदच करा; उदयनराजे भोसले यांची मागणी
राजकारणात सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही वापर करता, तरीही तुम्ही त्यांची अवहेलना का करता असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे.
मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यातून जोरदार टीका करण्यात आली. या वादग्रस्त वक्तव्यानंतर संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी ठोस भूमिका घेत राज्यपालांना हटवण्याची मागणी केली होती.
आज पत्रकार परिषद घेऊन आज आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत भाजपचे खासदार उदयनराजे यांनी आपली भूमिका मांडत ते म्हणाले की महापुरुषांचा अवमान केला जातो तो देशद्रोहच ठरवा आणि त्या प्रकारे कायद्यात तरतूदच करा अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा अवहेलना करत आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता, त्यांचा फोटो लावता अशी टीका करत त्यांनी तुम्ही त्यांच्या विचारांचा वापर करता तरीही तुम्ही जर अवहेलना करत असाल तर ते कृपा करून थांबवा अशी मागणीही त्यांनी यावेळई केली.
तुम्ही इतिहासाची मोडतोड करता. त्यामुळे मागून येणाऱ्या पिढ्यांना हाच खरा इतिहास आहे असं वाटू लागतं त्यामुळे महापुरुषांची बदनामी आणि त्यांची अवहेलना करणे थांबवण्याची त्यांनी सरकारकडे कळकळीची विनंती केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करणे, त्यांची बदनामी करणे, इतिहासाची मोडतोड करणे यासारखे प्रकार सध्या वाढीस लागले आहेत.
त्याबद्दल कोणालाही वाईटही वाटत नाही. मग तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी करता का असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे.