शहाण्या दर्शन घे काकाचं, माझी सभा झाली असती तर… रोहित पवार यांच्याशी अचानक भेट होताच अजितदादांनी लगावला टोला
Ajit Pawar Meets Rohit Pawar : कराडच्या प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. या काही सेकंदाच्या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे. निवडणूक आणि प्रचारसभा यावरून अजित पवारांनी रोहित यांना टोला लगावला आहे. वाचा सविस्तर...
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज 40 स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नेते मंडळी प्रीतीसंगमावर गेले होते. शरद पवार यांच्यासोबत रोहित पवार देखील प्रीती संगमावर गेले होते. इथून परतत असताना रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवारांनी रोहित यांना टोला लगावला. बच गया… काकाचं दर्शन घे दर्शन…, असं अजित पवार म्हणाले. यावेळी एकच हशा पिकला. रोहित पवारांनीही वाकून अजित पवारांना नमस्कार केला. शहाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं? बेस्ट ऑफ लक असं अजित पवार रोहित पवारांना म्हटलं आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करून शरद पवार पुण्याच्या दिशेने रवाना झाले. रोहित पवार साताऱ्यातील स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलत होते. मग तिथून रोहित पवारही निघाले. त्याच वेळी अजित पवार प्रीतीसंगमावर येत होते. यावेळी अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवारांनी रोहित पवारांना पाया पडायला लावलं.
माझे ते काका आहेत. ते वडीलधारे आहेत. त्यामुळे मी त्यांच्या पाया पडलो. आमच्या विचारांमध्ये सध्या भिन्नता आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती. आपली संस्कृती आहे. त्यामुळे मी त्यांच्या पाया पडलो, असं रोहित पवार म्हणाले. तर शरद पवार समोर आले असते तर मी त्यांच्या पाया पडलो असतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
कर्जत- जामखेडमध्ये अटीतटीची लढत
यंदाची कर्जत जामखेडची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. 1 हजार 243 मतांच्या फरकाने निसटता विजय रोहित पवार यांचा झाला. भाजप नेते राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात चुरशीची लढत झाली. 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. यातल्या शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत अटीतटीचा सामना झाला. यावरूनच अजित पवारांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे. अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग कर्जत जामखेडमध्ये आहे. जर या भागात अजित पवार यांनी सभा घेतली असती तर निकाल वेगळा लागण्याची दाट शक्यता होती. यावरून अजित पवारांनी रोहित यांना डिवचलं आहे.