‘दुसरी बायको!’ असं कुठं नाव असतंय व्हंय दुकानाचं? चेष्ठा न्हाय लेका, कराडमध्ये असतंय, ते बी सलूनचं!
कराड तालुक्यातील कोळे गावातील अमोल सकपाळ यांचा सलून हा खानदानी व्यवसाय आहे. अमोल यांनी दुकानाचे अद्यावत साधनासह नुतनीकरण केलंय. दुकानाला काय नाव द्यावं, या विचारात असतानाच त्यानं दुकानाला चक्क दुसरी बायको असे नाव दिलं.
कराड : ‘दुसरी बायको’ असं कुणी नाव ठेवतं का दुकानाचं? तुम्ही नाहीच म्हणाल! पण कराडमध्ये गेल्यावर तुमचा नाही.. हो मध्ये बदलून जाईल. अजिबात चेष्टा नाही. एकानं आपल्या सलूनचं नाव चक्क दुसरी बायको असं ठेवलंय. सलूनपेक्षा या अवलियानं दिलेल्या नावाचीच संपूर्ण कराड तालुक्याच चर्चा रंगली आहे. दुसरी बायको जेन्ट्स पार्लर कराज तालुक्यातील कोळे गावात आहेत. नावात काय ठेवलंय, असं ज्यानं कुणी म्हटलं होतं, त्याला पुन्हा पुन्हा हेच सांगावं लागेल.. ‘लेका.. नावातच सगळंकाही हाय बघ!’
कुणी ठेवलं नाव?
कराड तालुक्यात एक गाव आहे. गावाचं नाव कोळे. कोळे गावात एक तरुण राहतो. ज्याचं आपल्या व्यवसायावर बायकोइतकंच जीवापाड प्रेम आहे. इतकं जीवापाड की त्यानं आपल्या व्यवसायाला दुसरी बायको करुन टाकलं. अर्थात आपल्या दुकानाचं नावच दुसरी बायको ठेवून दिलंल.
ओमोल सकपाळ हा सलून व्यावासायिक. कोळे गावात त्याचं एक सलून आहे. या सलूनला त्यानं दिलेलं नाव सध्या चर्चेचा विषय ठरतोय. दुसरी बायको जेन्ट्स पार्लर असं नाव अमोलनं आपल्या दुकानाला दिलं आहे. आता या अनोख्या नावाची चर्चा झाली नसती, तरच नवल!
इतकं सोप्प नव्हतं नाव ठेवणं!
कराड तालुक्यातील कोळे गावातील अमोल सकपाळ यांचा सलून हा खानदानी व्यवसाय आहे. अमोल यांनी दुकानाचे अद्यावत साधनासह नुतनीकरण केलंय. दुकानाला काय नाव द्यावं, या विचारात असतानाच त्यानं दुकानाला चक्क दुसरी बायको असे नाव दिले. ‘दुसरी बायको जेंन्टस पार्लर’ अशा विचित्र नावाची पाटी पाहून बायकोसह घरातील सगळ्यांनी नावाला ‘नावं’ ठेवली! पण व्यवसायाप्रती असलेल्या प्रेमातून नाव देत असल्याचं समजवल्यानंतर घरच्यांचा विरोध मावळला. मात्र सैन्यातून निवृत्त झालेल्या अमोल यांच्या वडिलांचा विरोध कायम होता.
मी बायकोवर जेवढं प्रेम, माया करतो, तिला जपतो, तिच्या सानिध्यात असतो, तसाच मी बायकोनंतर घरातून आल्यावर सलूनच्या सानिध्यात असतो. दुकान आणि व्यवसायावर माझं बायको इतकंच प्रेम आहे. माझा संसार यशस्वी चालण्यासाठी दुकान आणि बायको दोन्हींची गरज असल्याने मी दुकानाला दुसरी बायको नाव दिलंय. सैनिकाची दुसरी पत्नी बंदूक असते, तसं माझं दुकान माझ्यासाठी आहे. कोणी काही म्हणो मी ठाम आहे, असं अमोल सकपाळनं वडिलांना समजावलं.
‘पहिली’ बायको काय म्हणाली?
सुरवातीला दुसरी बायको हे नाव थोडे विचित्र वाटतं. माझ्याशी लग्न केल्यामुळे त्यांनी पहिली बायको मला केलं आणि व्यवसायावर प्रेम असल्याने दुकानाला दुसरी बायको नाव दिलं. व्यवसाय आणि बायकोची जबाबदारी महत्वाची असते आणि ती एकमेकांना पुरक असल्यानं ती जबाबदारी त्यांनी यशस्वी निभावली आहे, असं अमोल सकपाळ यांच्या पत्नीनं म्हटलंय. दुसरी बायको असं दुकानाला नाव दिल्याचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया अमोल यांच्या पहिल्या बायकोनं दिली आहे.
कुठंय नेमकं सलून?
कराड-ढेबेवाडी मार्गावर असणाऱ्या कोळे गावातील प्रवेश द्वारावरच अमोल यांचं दुकान आहे. बनपुरी येथील श्रीक्षेत्र नाईकबाला येणाऱ्या भाविकांना अमोल यांच्या दुकानाच्या नावाची पाटी आकर्षित करतेय. काही उत्सुक पर्यटक,भाविक फोटो, सेल्फी काढून घेतात. तर काही जण या मागचे कारण विचारुन घेतात. एकूणच काय तर नाव हिट आहे बॉस! अमोलला पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही बायकोकडून भरभरून प्रेम मिळावं, या शुभेच्छा!
इतर बातम्या –
मुंबई पाठोपाठ ठाण्यातही 500 चौ. फुटापर्यंत घरांना करमाफी मिळणार, नेमकी योजना काय? वाचा सविस्तर
उद्यापासून मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; मुंबई महापालिका सज्ज, 9 केंद्रांवर लसीकरणाची सोय