Video : अमेरिकेतली नाही, महाबळेश्वरची वावटळ आहे ही! ढगात घुसणाऱ्या मातीचा भोवरा कॅमेऱ्यात कैद
थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर (Mahabaleshwar) जवळच्या वाई परिसरात ही वावटळ (Whirlwind) काल पाहायला मिळाली. त्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्यांची तारांबळ उडाली. वाई येथील ही वावटळ मोठी होती.
सातारा : सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. अनेकजण थंड (Cold) ठिकाणांचा तसेच थंड खाद्य पदार्थांचा आसरा घेताना दिसून येत आहेत. अनेकजण उन्हाळी पर्यटन करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जात आहेत. खरे तर सध्या उन्हाळा आहे म्हटल्यावर पावसाची किंवा वादळ, वारे, वावटळ येण्याचा फारसा संबंध नाही, मात्र अशी एक घटना घडली आहे, तीही अमेरिका किंवा इतर कोणत्या देशात नाही, तर आपल्याच महाराष्ट्रात. होय… थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर (Mahabaleshwar) जवळच्या वाई परिसरात ही वावटळ (Whirlwind) काल पाहायला मिळाली. त्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्यांची तारांबळ उडाली. साधारणपणे अशा वावटली आपण परदेशात पाहत असतो. वाळवंटी प्रदेशात तर नेहमीच अशा वावटळी येत असतात. मात्र वाई येथील ही वावटळ मोठी होती.
व्यवसायिकांनी लावलेले स्टॉल उडून गेले
थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या पाचगणी या ठिकाणच्या टेबल लँडवर मोठ्या स्वरूपात काल वावटळ तयार झालेली पाहायला मिळाली. सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक हे महाबळेश्वर, पाचगणी येथे पर्यटनाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. यातच दुपारच्या सुमारास मोठ्या स्वरूपात वावटळ तयार झाल्यामुळे काही वेळासाठी पर्यटक या ठिकाणी भयभीत झालेले पाहायला मिळाले. ही वावटळ येवढी मोठी होती, की या ठिकाणी असणाऱ्या व्यवसायिकांनी लावलेले स्टॉल उडून गेले. या झालेल्या प्रकारामुळे या ठिकाणच्या व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अशी वावटळ पाहिली नाही
अशाप्रकारची वावटळ दरवर्षी येते. दुपारच्या वेळी ही वावटळ येत असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. तर यावर्षी दुपारी दोन-अडीचच्या दरम्यान ही वावटळ आली. दरवर्षी अशी वावटळ येते मात्र ही वावटळ मागच्या 25 वर्षातली मोठी वावटळ होती, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.