सातारा हादरलं! अजिंक्यतारा गडावर तरूणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह, बिबट्याचाही गेला जीव, नेमकं प्रकरण काय?
Satara News | साताऱ्यामधील अजिंक्यतारा या गडावर अल्पवयीन तरूणीचा आणि बिबट्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोघांच्या मृत्यूचं गूढ नेमकं काय? बिबट्याचा नृत्यू नेमका कसा झाला जाणून घ्या.
सातारा : सातारा शहरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या अल्पवयीन युवतीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. हा मृतदेह अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली. युवतीच्या मृतदेहाशेजारी बिबट्याही मृतअवस्थेत सापडला. दोघांच्या मृत्यूचं नेमकं गूढ काय? बिबट्याचा मृत्यू नेमका कसा झाला? अजिंक्यतारा गडावर नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
अल्पवयीन मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत
अजिंक्यतारा किल्ल्याच्या एक महिन्यांपूर्वी संबंधित अल्पवयीन युवतीने उडी मारून आत्महत्या केली होती. या मुलीने आधी विष प्राशन केलं आणि त्यानंतर तिने उडी मारल्याची माहिती समोर आली. अजिंक्यताराच्या पायथ्यावरून डोंगरात फिरण्यासाठी गेलेल्या काही जणांना संबंधित युवतीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर घटनास्थळी सातारा शहर पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले.
पोलिसांना तपासादरम्यान, संबंधित युवती ही एक महिन्यापूर्वी सातारा शहरातून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. नागाठाणे परिसरातील ही अल्पवयी मुलगी आहे. बिबट्याचा त्याच ठिकाणी मृतदेह आढळल्याने विष प्राशन करून युवतीने उडी मारली त्यानंतर तो मृतदेह बिबट्याने खाल्ला असावा. आणि विषबाधेमुळे त्याचाही मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
बिबट्याचा मृत्यू हा नेमका युवतीचा मृतदेह खाल्ल्याने झाला की तो फांद्यांमध्ये अडकल्याने झाला? याचा तपास पोलीस करत आहेत. संबंधित युवतीचा मृतदेह ज्या ठिकाणी होता तिथल्याच एका झाडावर बिबट्याचा मृतदेह आढळलाय. त्यासोबतच युवतीचे पैंजण, पाण्याची बॉटल आणि बॅग त्या ठिकाणी आढळून आली.
दरम्यान, दोघांचे शवविच्छेदन केल्यानंतर या घटनेची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यावर नेमका कशाने मृत्यू झाली माहिती समोर येणार आहे. मात्र अल्पवयीन मुलीने आत्महत्या का केली? याचाही तपास पोलीस करत आहेत.