Satara : केळवली धबधबा पाहायला गेलेला राहुल घरी परतलाच नाही! मित्रांनी घरी आल्यावर सांगितलं, ‘तो वाहून गेलाय’
Satara News : राहुल वाहून गेल्यानंतर त्याच्या मित्रांना आरडाओरडा गेला. त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण तोपर्यंत पाण्याच्या प्रवाहात राहुल गायब झाला होता.
सातारा : पावसात प्रत्येकालाच धबधब्याचं (Waterfalls in Maharashtra) आकर्षण वाटतं. धबधबे पाहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते. पण धबधबे जीवघेणे ठरु शकतात, हे अनेकदा काही विक्षिप्त घटनांवरुन अधोरेखित झालंय. अशातच आणखी एक धक्कादायक घटना साताऱ्यातून (Satara Youth Drowned) समोर आली आहे. साताऱ्यातील एक तरुण धबधबा पाहायला मित्रांसोबत गेला होता. हा तरुण धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेलाय. धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज त्याला आला नाही. मित्रांच्या देखतच तो वाहून गेला. यानंतर धास्तावलेल्या मित्रांनी घरी आल्यानंतर तरुणाच्या घरी घडलेला सगळा प्रकार सांगितलं. त्यानंतर आता या तरुणाचा शोध घेतला जातो आहे. या धक्कादायक प्रकाराने वाहून गेलेल्या तरुणाच्या घरातल्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. सध्या बेपत्ता तरुणाचा शोध सुरु असून याप्रकरणी पोलीस (Satara Police News) ठाण्यातही नोंद करण्यात आली आहे.
केळवली धबधब्यावरील घटना
राहुल माने हा साताऱ्याच्या विकास नगर मध्ये राहणारा अठरा वर्षांचा तरुण मुलगा. तो आपल्या मित्रांसोबत केळवली धबधबा पाहण्यासाठी गेला होता. विकास नगर येथील आपल्या मित्रांसोबत तो धबधब्यावर पावसात अंघोळ करण्याचा आनंद लुटत होता. पण धबधब्याच्या प्रवाहाचा त्याला अंदाज आला नाही आणि राहुल वाहून गेला. दरम्यान, राहुल वाहून गेल्यानंतर त्याच्या मित्रांना आरडाओरडा गेला. त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण तोपर्यंत पाण्याच्या प्रवाहात राहुल गायब झाला होता.
अठरा वर्षांचा राहुल वाहून गेलाय, हे आता त्याच्या घरातल्यांना सांगायचं कसं, असा प्रश्न त्याच्या मित्रांना पडला होता. अखेर सगळे मित्र जड अंतःकरणाने घरी परतले. त्यांनी कसंबसं राहुलच्या कुटुंबीयांना घडलेली हकीकत सांगितलं. राहुल वाहून गेलाय, हे कळल्यानंतर माने कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला.
शोध सुरु
राहुलचे मित्र घरी आल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाल्यामुळे त्याच्या शोध कार्याला आधीच उशीर झाला होता. यानंतर सातारा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. त्यानंतर लगेचच त्याच्या बचावकार्यासाठी शोध मोहीम राबवणं गरजेच होतं. अखेर शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने आता राहुलचा शोध घेतला जातोय. रात्री उशीर झाल्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर आता सकाळपासून पुन्हा राहुलचा शोध घेतला जातोय.