यांच्या औषधानं तुम्ही बरे व्हालं, शंभूराज देसाई यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका
मागील सहा महिन्यांपूर्वीच आम्ही तात्कालीन नगरविकास मंत्री यांच्यासह काही आमदार अयोध्येला जाणार होतो.
सातारा : आदित्य ठाकरे यांना आमच्यावर टीका करण्याशिवाय कोणतं काम उरलेलं नाही. आम्ही घोषणा करत नाही तर त्या कृतीमध्ये आणतो. त्या निर्णयाची अंमलबजावणी करतो. आदित्य ठाकरे यांनी फिल्डवर जाऊन पाहणी करावी. सामान्य शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांची चौकशी करावी. आम्ही दिवाळी असताना देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहोत. निकषात नसताना देखील शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करतोय. तुम्हाला जर मळमळत असेल तर यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे डॉक्टर शिंदे साहेब. डॉक्टर शिंदे यांच्या औषधानं तुम्ही बरे व्हालं, अशी जोरदार टीका शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जानेवारीत महापालिकेच्या निवडणुका होण्याचे संकेत दिले होते. यावर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही महापालिकेच्या निवडणुका घ्यायला केव्हाही तयार आहोत. मात्र न्यायालयीन प्रक्रियेची जी गुंतागुंत आहे. त्या संपल्या की निवडणुका होतील.
मागील सहा महिन्यांपूर्वीच आम्ही तात्कालीन नगरविकास मंत्री यांच्यासह आम्ही आमदार अयोध्येला जाणार होतो. मात्र पक्ष आदेश आल्यानंतर तो दौरा रद्द झाला होता. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे अयोध्येला जाण्याबाबत आग्रह धरला आहे. त्यानुसार लवकरच आम्ही अयोध्येला जाऊ.
मी सध्या गावाकडे असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मला माहीत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच याबाबत निर्णय घेतील, असे मत शंभुराज देसाई यांनी व्यक्त केलंय.
देशाचे विभाजन करण्याचा डाव मोदी करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यानंतर याला मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिउत्तर दिलंय. जागतिक महासत्ता बनवण्याचे काम हे मोदी सरकार करत आहे. याला प्रत्येक राज्य सरकार पाठिंबा देत आहेत. लोकांची मने विचलित करण्याचे काम केले जात आहे.
इमरान प्रतापगडी कोण आहेत, हे मला माहीत नाही. प्रत्येकाला धार्मिक स्थळावर जाण्याचा अधिकार आहे. कोणी कुठे जावं याबाबतही कोण टीका करत असेल तर हे दुर्दैव आहे. कोणी कितीही टीका केली तरी आमच्यावर कसलाही परिणाम होणार नसल्याचे मत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.