सातारा : भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivsendra Raje) यांनी निवडणुकीआधीच राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपचं कमळ हातात घेतलं. त्यांच्यापाठोपाठ खासदार उदयनराजे हेही खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीत दाखल झाले. दोन्ही राजे भाजपात गेल्याने राष्ट्रवादीला साताऱ्यात मोठं खिंडार पडल्याचं चित्र काही काळ दिसलं. मात्र राष्ट्रवादीने (NCP) काही काळातच हे भरून काढलं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अजित पवारांचं (Ajit Pawar) कौतुक करायची एकही संधी शिवेंद्रराजे भोसले सोडताना दिसत नाहीत. आज पुन्हा साताऱ्यात त्यांनी अजित पवारांवर स्तुतीसुमनं उधळली आहे. त्यामुळे शिवेंद्रराजे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चा आता राजकारणात रंगू लागल्या आहेत. सातारमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी बताया बोंडरवाडी धरणाचे काम अजित दादा हेच हे काम करू शकतात. कारण त्यांच्या सारखाच नेता धडाडीचे निर्णय घेऊ शकतो. त्यांना भेटून त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत, असे वक्तव्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.
गेल्या निवडणुकीपूर्वी विरोधात असल्याने लोकांची काम होत नाही, असे म्हणत शिवेंद्रराजे यांनी भाजपचा रस्ता धरला आणि काही दिवसातच चित्र पालटलं, कारण सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजप सत्तेच्या बाहेर राहिली. सत्तेची समीकरण ही बदलत गेली. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. आणि भाजपसह शिवेंद्रराजे यांनाही विरोधात बसावं लागलं. त्यामुळे आता राजेंना पुन्हा सत्तेची ओढ लागली आहे का? असाही सवाल राजकारणात विचारण्यात येतोय.
तसेच राज्यसभेच्या निवडणुकीवरुन बोलताना संभाजीराजे यांचा गेम झाला, असे वक्तव्य शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे. संभाजी राजेंवर गेम झाला, मात्र हा गेम कोणी केला हे त्यांना माहीत आहे. आता त्यांना ते कळालं आहे, छत्रपती घराण्याचे ते वारसदार आहेत. मी वयाने त्यांच्यापेक्षा लहान आहे. मराठा आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या मागे महाराष्ट्रातील मोठा मराठा समाज आहे. त्यांची खासदारकी गेली असेल परंतु घरातील माणूस म्हणून मी त्यांना एकच सागेन की मराठा समाजाला एकत्र ठेवण्याच काम त्यांनी करावे, असे भाजप आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यसभेच्या निवडणुकीचा सस्पेन्स वाढला होता. कारण संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याची हाक दिली होती. मात्र आता सेनेने उमेदवार दिल्याने संभाजीराजे यांना माघार घ्यावी लागली आहे.