गावी यात्रेला चालले होते कुटुंब, मात्र गावी पोहचलेच नाहीत; कुटुंबासोबत नेमके काय घडले?
पुण्यात कामानिमित्त राहणारे महारुगडे कुटुंबीय यात्रेसाठी पणुंद्रे येथे जाण्यास निघाले. मात्र गावी पोहचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
कराड / दिनकर थोरात : येणपे-लोहारवाडी येथे रिक्षा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालयाची घटना कराड चांदोली मार्गावर घडली. या अपघातात तीन जणांचा जागीच अंत झाला. अपघातात रिक्षा चालक, त्याची पत्नी, मुलगी ठार झाले. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अपघातात ठार झालेले तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पणुंब्रे गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती कराड तालुका पोलिसांनी दिली. या अपघातात उपचारासाठी कराड येथे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेने पणुंब्रे गावासह शाहूवाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
अपघातात रिक्षाचा चक्काचूर
कराड तालुक्यातील कराड चांदोली मार्गावर येणपे-लोहारवाडी येथे रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून, तिघांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमधे पणुंब्रे, शाहूवाडी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. सुरेश सखाराम महारूगडे, सुवर्णा महारूगडे, समिक्षा महारूगडे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
पुण्यात कामानिमित्त राहत असलेले महारुगडे कुटुंब आपल्या गावी पणुंद्रे येथे यात्रेसाठी चालले होते. मात्र गावी पोहचण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. कराड येथे चांदोली मार्गावर ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत त्यांच्या रिक्षाला अपघात झाला. यात पती-पत्नी आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघाताची चौकशी सुरु
दरम्यान, महारूगडे यांच्या नातेवाईकांसह मित्र परिवाराने घटनास्थळी धाव घेतली. पणुंद्रे गावची यात्रा असल्याने पुण्यात कामानिमित्त रहात असलेले महारूगडे कुटुंबीय गावी येत होते. पुण्यातून रिक्षाने ते पणुंब्रे गावाकडे पोहचण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. रिक्षाला भीषण अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. अपघात नेमका कसा झाला याची पोलीस चौकशी करत आहेत.