पालघरमध्ये होणार सॅटेलाईट विमानतळ; मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळासोबत बैठक
मुंबई विमानतळावरील प्रवाशांचा भार हलका करण्यासाठी आता पालघरमध्ये सॅटेलाईट विमानतळ उभारण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई : विमानतळावर (airport) प्रवासी वाहतुकीचा (Transportation) प्रचंड ताण असतो. हा ताण कमी करण्यासाठीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. मुंबई विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आाता पालघरमध्ये (Palghar) सॅटेलाईट विमातळ उभारण्यात येणार आहे. लंडनमधील हिथ्रो विमानतळाच्या धर्तीवर पालघरमध्ये सॅटेलाईट विमातळ उभारले जाणार आहे. विमानतळाच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळाबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यातील विमानतळ विकासासाठी शासन करत असलेल्या कृती आराखड्यातील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. पालघरमध्ये विमानतळ झाल्यास मुंबई विमानतळावरील प्रवाशांची वर्दळ कमी होईल, तसेच दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.
हिथ्रो विमानतळाच्या धर्तीवर उभारणी
लंडन येथील हिथ्रो विमानतळावर देखील प्रवाशांची कायम वर्दळ असायची. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. ही समस्या दूर करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात सहा विमानतळांची उभारणी करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे विभाजन झाले आणि हिथ्रो विमानतळावरील गर्दी कमी झाली. याच धर्तीवर आता मुंबई विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी पालघरमध्ये विमानतळ उभारण्यात येणार आहे. नाशिक, ठाणे, किंवा गुजरातमधील प्रवासी मुंबईत येण्याऐवजी पालघरच्या विमानतळावरून लहान विमानांनी ये-जा करू शकतील. असा या मागील उद्देश आहे. विशेष म्हणजे या विमान सेवेचा भाडेदर देखील कमी असणार आहे अशी माहिती समोर येत आहे.
मुंबई विमानतळावर प्रवाशांचा अतिरिक्त भार
मुंबई विमानतळाची प्रवासी वहनक्षमता एकू वर्षाकाळी साडेचार कोटी इतकी आहे. मात्र ही क्षमता केव्हाच पार झाली असून, प्रवासी वहनक्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवाशांचा भार या विमानतळावर पडत आहे. प्रवाशांची संख्या वाढल्याने येथील पायभूत सुविधा देखील अपुऱ्या पडू लागल्या आहेत. ही समस्या दूर करून प्रवासी संख्येचे विभाजन करण्यासाठी पालघरमध्ये सॅटेलाईट विमानतळ प्रस्तावित आहे. त्यावर तातडीने काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. दरम्यान नवी मुंबईमध्ये देखील विमानतळ तयार होत आहे. मात्र या विमातळावर देखील प्रवाशांची गर्दी असणार आहे. यासाठीच आता पालघरमध्ये विमानतळ उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे.