खोक्या भोसलेच्या घरी सापडलेले जाळं नेमकं कशासाठी? वकिलांनी केला मोठा खुलासा
शिरूरमधील मारहाण प्रकरणात सापडलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांचे वकील अॅड. अंकुश कांबळे यांनी कोर्टातील घटना आणि घरी सापडलेल्या जाळ्यांबद्दल स्पष्टीकरण दिले.

भाजप पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. सध्या सतीश उर्फ खोक्या भोसले हा तुरुंगात आहे. शिरुरमधील ढाकणे कुटुंबाला मारहाणीनंतर तो फरार झाला होता. यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेला अटक करुन 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली. यानंतर आज शिरूर कासार कोर्टात हजर करण्यात आले. आता त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
सतीश भोसलेला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सतीश भोसलेचे वकील ॲड. अंकुश कांबळे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कोर्टात काय काय घडलं, याबद्दलची सर्व सविस्तर माहिती दिली. तसेच वकील अंकुश कांबळे यांनी सतीश भोसलेच्या घरी जाळं का सापडलं, याबद्दलही त्यांनी भाष्य केले.
14 दिवसांची न्यायालय कोठडी
पोलिसांनी केलेल्या तपासात पूर्ण बाबी झाल्या आहेत. आता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालय कोठडी सुनावली आहे. आता इथं अटक होणार नाही, जेलमध्ये गेल्यानंतर जेलमधून त्यांना घ्यावा लागणार आहे, असे ॲड. अंकुश कांबळे म्हणाले.
यानंतर त्यांना सतीश भोसलेच्या पत्नीच्या आंदोलनाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही, आमचा घटनेवर आणि न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. सदर गुन्हा हा खोटा आहे आणि ते न्यायालय सिद्ध करू, लवकरात लवकर जामीन होऊन सतीश भोसले बाहेर येतील, असा विश्वास ॲड. अंकुश कांबळे यांनी व्यक्त केला.
घरामध्ये जाळे नाही निघणार तर काय टाळ आणि मृदंग निघणार का?
यावेळी ॲड. अंकुश कांबळे यांनी सतीश भोसलेच्या घरी जाळं का सापडलं, याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. शिकार करणे हा पारधी समाजाचा खानदानी व्यवसाय आहे. त्यांच्या घरामध्ये जाळे नाही निघणार तर काय टाळ आणि मृदंग निघणार का? जाळ्यांनी हरण पकडले जात नाहीत. हरणाला फाशे लावावे लागतात. जाळ्यामध्ये लाव्हर, मासे, चित्र पकडले जातात, खानदानी व्यवसाय असल्यामुळे ते जाळे होते, असे ॲड. अंकुश कांबळे यांनी म्हटले.